जळगाव हादरलं! ६ मिनिटांत एटीएम उपटून ७ लाखांचा फिल्मी दरोडा; मालवाहू वाहन चोरी करून टोळी फरार

फुले शाहू आंबेडकर
0
जळगाव /प्रतिनिधी : शहराच्या मध्यवर्ती आणि कायम गजबजलेल्या पोलन पेठ परिसरात घडलेल्या थरारक आणि धाडसी चोरीने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. अज्ञात चोरट्यांनी अत्यंत नियोजनबद्ध आणि फिल्मी पद्धतीने एटीएम मशीन उखडून नेऊन सुमारे ७ लाख रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना गुरुवारी मध्यरात्रीनंतर उघडकीस आली आहे. या प्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपासाला वेग दिला आहे.

 फक्त ६ मिनिटांत दरोडा; आधी वाहन चोरी, मग एटीएमवर हल्ला
प्राथमिक माहितीनुसार, चोरट्यांनी प्रथम जोशी पेठ परिसरातून एक मालवाहू वाहन चोरी करून आपल्या योजनेची सुरुवात केली. त्यानंतर हेच वाहन वापरून त्यांनी पोलन पेठेतील सत्यम प्लाझामधील एक्विटास स्मॉल फायनान्स बँकेच्या एटीएम केंद्रावर धाड टाकली.
रात्री अंदाजे १:२५ वाजता एक संशयित इसम तोंड झाकून एटीएम केंद्रात शिरला. त्याने मशीनला मजबूत दोरखंड बांधला आणि तो दोर बाहेर उभ्या असलेल्या वाहनाला जोडण्यात आला. काही क्षणांतच वाहनाला दिलेल्या जोरदार हिसक्याने एटीएम मशीन जागेवरून उपटून खाली कोसळले.
 सीसीटीव्हीत कैद; टोळीची अचूक टाइमिंग
मशीन पडताच बाहेर दबा धरून बसलेले आणखी तीन साथीदार आत धावले. अवघ्या ६ मिनिटांत संपूर्ण एटीएम मशीन वाहनात टाकण्यात आले. रात्री १:३१ पर्यंत हा संपूर्ण प्रकार पूर्ण करून चोरटे भुसावळच्या दिशेने पसार झाले. विशेष म्हणजे, ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाली आहे.
 पोलीस तपास वेगात; वाहन व मशीन सापडले, रोकड गायब
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी नाकाबंदी करत शोधमोहीम सुरू केली. काही वेळातच कंडारी गावाजवळील मन्यारखेडा शिवारात चोरीस गेलेले वाहन आणि फोडलेल्या अवस्थेतील एटीएम मशीन आढळून आले. मात्र, त्यातील सर्व रोकड आधीच लंपास करण्यात आली होती.
एटीएममध्ये १० लाख; ७ लाखांची रोकड लंपास
बँकेचे शाखा व्यवस्थापक हरीश गांधी यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन एप्रिल रोजी एटीएममध्ये सुमारे १० लाख रुपये भरले होते. चोरीच्या वेळी त्यात अंदाजे ७ लाख रुपये शिल्लक होते. याशिवाय मशीनचे सुमारे अडीच लाखांचे नुकसान झाले असून एकूण नुकसान जवळपास ९.५ लाखांपर्यंत पोहोचले आहे.
 सुरक्षेवर प्रश्नचिन्ह; नागरिकांमध्ये भीती
शहराच्या मध्यवर्ती भागात एवढा मोठा दरोडा पडूनही कोणालाही खबर न लागणे, तसेच एटीएम केंद्रावर सुरक्षा रक्षकांचा अभाव असल्याने सुरक्षेच्या यंत्रणांवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे.
 सराईत टोळीचा संशय; तांत्रिक तपास सुरू
सीसीटीव्ही फुटेज, वाहनाचा मागोवा आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी संशयितांचा शोध सुरू केला आहे. ही घटना एखाद्या सराईत आणि प्रशिक्षित टोळीने केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अधिक तपास सुरू असून लवकरच आरोपींचा माग काढला जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default