महाराष्ट्राच्या राजकारणात ओबीसी प्रतिनिधित्वाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, सावता परिषदेच्या वतीने ओबीसी नेते कल्याणराव आखाडे यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर करण्याची जोरदार मागणी करण्यात आली आहे. धुळे जिल्हा सावता परिषदेचे अध्यक्ष युवराज माळी व सावता सैनिकांनी ही मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) समोर ठामपणे मांडली आहे.
राज्यातील विधान परिषदेसाठी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकूण ११ जागांसाठी राजकीय हालचाली वेगाने सुरू झाल्या आहेत. अशा निर्णायक क्षणी ओबीसी समाजाचे भक्कम नेतृत्व करणाऱ्या कल्याणराव आखाडे यांना संधी द्यावी, अशी मागणी आता राज्यभरातून जोर धरताना दिसत आहे.
कल्याणराव आखाडे, ज्यांना “कल्याण काका” म्हणूनही ओळखले जाते, हे गेल्या अनेक वर्षांपासून ओबीसी समाजाच्या न्याय हक्कांसाठी सातत्याने लढा देत आहेत. कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता तळागाळातील जनतेशी थेट संवाद साधत संघटन उभारणी करणारे, रोखठोक आणि बेधडक भूमिका घेणारे नेते म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
सावता परिषदेच्या माध्यमातून त्यांनी राज्यातील बहुसंख्य जिल्ह्यांमध्ये समाज संघटित करण्याचे काम केले आहे. संत शिरोमणी सावता महाराज यांच्या कर्मभूमीत २०१० पासून मेळावे आयोजित करून सामाजिक प्रश्नांवर शासनाचे लक्ष वेधण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे सुमारे २०० कोटी रुपयांचा निधी मंजूर होऊन तीर्थक्षेत्राला ‘अ’ दर्जा मिळवून देण्यात यश आल्याचे सांगितले जाते.
याशिवाय, ओबीसी आरक्षण, जातनिहाय जनगणना, सामाजिक न्याय यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर त्यांनी राज्यभर जनजागृती केली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली घेतलेल्या विविध मेळावे आणि आंदोलने यामुळे ओबीसी प्रश्नांना नवे धारदार रूप मिळाले आहे.
दरम्यान, सावता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, “ओबीसींच्या खऱ्या नेतृत्वाला डावलले गेले, तर याचे राजकीय परिणाम भोगावे लागतील.” त्यामुळे आगामी विधान परिषद निवडणुकीत ही मागणी किती प्रभाव टाकते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

