देहूरोड रक्तरंजित! ‘तो’ जीव वाचवण्यासाठी पळत होता… पण हल्लेखोर थांबले नाहीत; २१ गोळ्यांनी रमेश रेड्डीची निर्घृण हत्या

फुले शाहू आंबेडकर
0
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी - देहूरोड परिसरात मंगळवारी (दि. २८ एप्रिल) रात्री घडलेल्या थरारक घटनेने संपूर्ण परिसर दहशतीच्या छायेत गेला आहे. रमेश रेड्डी (रा. देहूरोड) याचा भर रस्त्यात पाठलाग करून गोळ्या झाडत आणि नंतर कोयत्याने वार करत खून करण्यात आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रमेश रेड्डी हा आपल्या मित्रासह संतोष स्वीट मार्टच्या मागील बाजूस असलेल्या कपड्यांच्या दुकानात गेला होता. खरेदी करून दोघे दुचाकी सुरू करत असतानाच, मोटार आणि दुचाकीवरून आलेल्या काही संशयितांनी त्यांना अचानक घेरले. हल्लेखोरांच्या हातात पिस्तूल आणि धारदार शस्त्रे असल्याचे सांगितले जाते.
शिवीगाळ करत संशयितांनी रमेशकडे धाव घेतली. धोका लक्षात येताच रमेश आणि त्याच्या मित्राने मदतीसाठी आरडाओरडा केला. मात्र, काही क्षणांतच परिसरात गोळीबाराचा आवाज घुमला आणि नागरिकांनी जीवाच्या भीतीने पळ काढला.
रमेश जीव वाचवण्यासाठी पळत सुटला… पण हल्लेखोरांनी त्याचा पाठलाग सोडला नाही. पाठीमागून सलग गोळ्या झाडत त्याला लक्ष्य करण्यात आले. प्राथमिक माहितीनुसार, तब्बल २१ गोळ्या झाडण्यात आल्या, त्यापैकी ९ गोळ्या त्याच्या शरीरात लागल्या. त्यानंतर हल्लेखोरांनी कोयत्याने डोक्यावर वार केल्याचेही समोर आले आहे.
गंभीर जखमी अवस्थेत रमेशला प्रथम देहूरोड येथील रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी पिंपरीतील महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला उपचारापूर्वीच मृत घोषित केले.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच वायसीएम रुग्णालय परिसरात समर्थक, नातेवाईक आणि नागरिकांची मोठी गर्दी झाली. काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी तात्काळ बंदोबस्त वाढवत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि नागरिकांना शांततेचे आवाहन केले.
पूर्ववैमनस्याचा कोन?
या हत्येमागे जुने वैमनस्य किंवा पूर्वनियोजित कट असल्याची शक्यता पोलिसांकडून तपासली जात आहे. तीन महिन्यांपूर्वी रमेशला धमक्या मिळाल्याचीही माहिती समोर येत आहे. त्यानुसार संशयितांनी पाळत ठेवून ही हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
तोच चौक… पुन्हा गोळीबार!
देहूरोडमधील याच परिसरात सुमारे सात वर्षांपूर्वी एका तत्कालीन नगरसेवकावर गोळीबार झाला होता. आता पुन्हा त्याच ठिकाणी खून झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे सावट अधिक गडद झाले आहे.
वर्षभरात दोन्ही भावांचा अंत
रमेश रेड्डी आणि त्याचा भाऊ विक्रम यांचे आयुष्य संघर्षमय होते. त्यांच्या आईने हातगाडीवर इडली विक्री करून कुटुंबाचा उदरनिर्वाह केला. मात्र, दुर्दैवाने विक्रम रेड्डी याचा १३ फेब्रुवारी २०२५ रोजी वाढदिवसाच्या कार्यक्रमात गोळीबारात मृत्यू झाला होता. आता वर्षभरातच दोन्ही भावांचा खून झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पोलिस तपास सुरू
या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन आणि स्थानिक माहितीच्या आधारे तपास वेगाने सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default