नाशिक : राज्यभर खळबळ उडवणाऱ्या भोंदू अशोक खरात प्रकरणात रविवारी मोठी नाट्यमय घडामोड घडली. राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना अखेर नाशिकमध्ये एसआयटीसमोर हजर व्हावे लागले. विशेष म्हणजे पुण्याहून नाशिककडे रवाना होताना त्यांनी तब्बल तीन वेळा कार बदलल्याची चर्चा दिवसभर राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात रंगली.
सकाळी गुन्हे अन्वेषण विभागाच्या कार्यालयात एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते आणि डीवायएसपी किरणकुमार सूर्यवंशी यांनी जवळपास ५० मिनिटे चाकणकर यांची कसून चौकशी केली. या चौकशीत अशोक खरातशी असलेले संबंध, शिवनिका ट्रस्टमधील भूमिका, महिला आयोगाच्या काळातील निर्णय, कॉल रेकॉर्ड्स, संपर्क साखळी आणि तक्रारींच्या संदर्भातील संवेदनशील मुद्द्यांवर प्रश्नांचा भडिमार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
आधी टाळाटाळ… अखेर एसआयटीसमोर हजेरी
सूत्रांच्या माहितीनुसार, एसआयटीने मागील महिन्यातच चाकणकर यांना चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे पत्र दिले होते. मात्र तांत्रिक कारणे पुढे करत त्यांनी नाशिकला येण्यास असमर्थता दर्शवली होती. त्यामुळे संशयाचे वातावरण अधिक गडद झाले होते. अखेर वाढत्या दबावानंतर रविवारी त्या नाशिकमध्ये दाखल झाल्या.
त्यांच्या प्रवासादरम्यान सुरक्षा, गुप्तता की राजकीय रणनीती? याबाबत चर्चा रंगली कारण पुण्याहून निघाल्यानंतर त्यांनी तीन वेळा वाहन बदलल्याची माहिती समोर आली. या हालचालींमुळे प्रकरणातील गूढ आणखी वाढल्याची भावना व्यक्त होत आहे.
‘गुरू’ म्हणून श्रद्धा… पण दुसरी बाजू माहीत नव्हती?
एसआयटी चौकशीत रुपाली चाकणकर यांनी महत्त्वाचे स्पष्टीकरण दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. “माझे कुटुंब वारकरी परंपरेचे आहे. आध्यात्मिक श्रद्धेपोटी मी अशोक खरात आणि त्याच्या पत्नीला गुरू मानत होते,” असे त्यांनी चौकशीत सांगितल्याचे समजते.
तसेच खरात याच्यावर गंभीर आरोप असल्याची माहिती आपल्याला नव्हती, असा दावा त्यांनी केला. “माझे आणि खरातचे कोणतेही आर्थिक व्यवहार नाहीत. कोणालाही त्याच्याकडे जाण्यासाठी मी कधीच दबाव किंवा आग्रह केला नाही,” अशी बाजूदेखील त्यांनी मांडल्याचे समोर आले आहे.
शिवनिका ट्रस्टमुळे वाढले प्रश्नचिन्ह
चौकशीत सर्वाधिक भर देण्यात आलेला मुद्दा म्हणजे सिन्नर येथील शिवनिका ट्रस्ट. या ट्रस्टवर रुपाली चाकणकर सदस्या असल्याचे समोर आल्यानंतर प्रकरण अधिकच चर्चेत आले होते. अशोक खरातच्या कथित साम्राज्यात या ट्रस्टची भूमिका काय होती? कोणत्या उपक्रमांमध्ये सहभाग होता? निधी, संपर्क आणि कार्यक्रमांचे स्वरूप काय होते? अशा अनेक मुद्द्यांवर एसआयटीने बारकाईने चौकशी केल्याची माहिती मिळत आहे.
महिला आयोगाच्या पदाचा गैरवापर?
चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्षा असताना काही तक्रारींच्या हाताळणीत प्रभाव टाकण्यात आला का? खरातविरोधातील काही बाबींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाले का? या प्रश्नांवरही चौकशीत चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे.
एसआयटीने त्यांच्या कॉल डिटेल्स, भेटीगाठी, कार्यक्रमातील उपस्थिती आणि काही संवेदनशील संपर्कांबाबतही माहिती घेतल्याची चर्चा आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा खळबळ
भोंदू अशोक खरात प्रकरण आधीच राज्यभर चर्चेत असताना आता त्यात राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मोठी नावे समोर येऊ लागल्याने वातावरण तापले आहे. महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर काम करणाऱ्या संस्थेच्या माजी अध्यक्षा चौकशीच्या भोवऱ्यात आल्याने विरोधकांनीही सरकारवर जोरदार हल्लाबोल सुरू केला आहे.
दरम्यान, एसआयटी पुढील काही दिवसांत आणखी काही महत्त्वाच्या व्यक्तींना चौकशीसाठी बोलावू शकते, अशी माहिती समोर येत असून या प्रकरणाचा तपास आता अधिक वेगाने पुढे जाताना दिसत आहे.

