रुग्णालय की मृत्यूचा सापळा?” सोनगीर ग्रामीण रुग्णालयाच्या भोंगळ कारभाराने ग्रामस्थ संतप्त; अपघातग्रस्ताला वेळेत उपचार न मिळाल्याचा गंभीर आरोप

फुले शाहू आंबेडकर
0
सोनगीर (धुळे) : धुळे जिल्ह्यातील सोनगीर ग्रामीण रुग्णालयाचा ढिसाळ आणि बेफिकीर कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून, डॉक्टरांची अनुपस्थिती, वैद्यकीय सुविधांचा अभाव आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे संतप्त ग्रामस्थांनी रुग्णालय प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. आपत्कालीन परिस्थितीतही रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे.

स्थानिक ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, रुग्णालयात अनेकदा डॉक्टर वेळेवर उपस्थित राहत नाहीत. आवश्यक औषधे, वैद्यकीय उपकरणे आणि रुग्णवाहिका यांचा अभाव असल्याने गंभीर रुग्णांना जीव धोक्यात घालून इतरत्र हलवावे लागते. रुग्णालय परिसरात सुरक्षा व्यवस्था नसल्याचा, CCTV कॅमेरे नसल्याचा तसेच काही कर्मचाऱ्यांकडून रुग्ण व नातेवाईकांशी उद्धट वर्तन केले जात असल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
दरम्यान, सोनगीर येथील धनगर समाजाचे अध्यक्ष तथा बहुजन समाज शिक्षण मंडळाच्या वरिष्ठ महाविद्यालयातील कर्मचारी ज्ञानेश्वर शंकर धनगर यांचा निजामपूरहून सोनगीरकडे येत असताना बोरीस परिसरात अपघात झाला. या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने सोनगीर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्राथमिक उपचारासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्याचा आरोप नातेवाईक आणि ग्रामस्थांनी केला आहे.
ग्रामस्थांच्या आरोपानुसार, रुग्णालयात डॉक्टर अनुपस्थित होते, आवश्यक उपकरणांची कमतरता होती आणि रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध झाली नाही. त्यामुळे गंभीर अवस्थेतील रुग्णाला तातडीची मदत मिळू शकली नाही. नंतर डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली.
घटनेनंतर सकाळी संतप्त ग्रामस्थ आणि युवकांनी मोठ्या संख्येने रुग्णालयात गर्दी करत प्रशासनाला जाब विचारला. मात्र, अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने वातावरण अधिक तापले. याचदरम्यान रुग्णालय परिसरात दारूच्या रिकाम्या बाटल्या आढळून आल्याचा दावा ग्रामस्थांनी केला असून, या प्रकारामुळे रुग्णालयातील शिस्त आणि सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
यानंतर ग्रामस्थांनी थेट सोनगीर पोलीस ठाणे गाठून लेखी तक्रार दिली. धुळे ग्रामीणचे आमदार राम भदाणे यांनाही दूरध्वनीद्वारे संपूर्ण प्रकाराची माहिती देण्यात आली. संबंधित प्रकाराची चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन आमदारांकडून देण्यात आल्याचे सांगण्यात आले.
परिस्थिती तणावपूर्ण होत असताना प्रमोद धनगर आणि सोनगीर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तुषार देवरे यांनी नागरिकांची समजूत काढत कायद्याच्या चौकटीत राहून कारवाई होईल, असे सांगून जमाव शांत केला.
या वेळी प्रमोद धनगर, भटू धनगर, रमजान पिंजारी, किशोर पावनकर, पराग धनगर, विश्वास धनगर, माजी सरपंच किशोर पाटील, अविनाश धनगर, प्रदीप लांडगे, निहाल पिंजारी, तृजेश पाटील, हर्षल धनगर, लिलाधर धनगर, रविंद्र धनगर, ललित माळी, भूषण माळी, सागर माळी, गौरव माळी, विकास धनगर यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default