पालघर | प्रतिनिधी
आनंदाच्या क्षणी अचानक मृत्यूने धडक दिल्याने पालघर जिल्हा अक्षरशः हादरून गेला आहे. साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी निघालेल्या वऱ्हाडावर काळाने झडप घालत भीषण अपघात घडला. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील धानिवरी गावाजवळ भरधाव कंटेनरने वऱ्हाडींनी भरलेल्या आयशर ट्रकला जोरदार धडक दिल्याने १२ जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये महिला, पुरुष आणि लहान मुलांचाही समावेश असल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, डहाणू तालुक्यातील बापूगाव येथून खडकीपाडा येथे साखरपुड्यासाठी वऱ्हाड निघाले होते. आयशर ट्रकमध्ये क्षमतेपेक्षा अधिक, म्हणजेच तब्बल १०० हून अधिक वऱ्हाडी प्रवास करत असल्याची माहिती समोर आली आहे. नवरीच्या घराजवळ पोहोचण्याच्या काही क्षणांपूर्वीच हा भीषण अपघात झाला आणि आनंदाचा प्रवास क्षणार्धात शोकांतिकेत बदलला.
कंटेनरचा केबिन थेट वऱ्हाडावर कोसळला
प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, मुंबईकडून भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने अचानक आयशर ट्रकला जबर धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी भीषण होती की कंटेनरचा पुढील केबिन भाग तुटून थेट ट्रकवर जाऊन कोसळला. त्या वजनाखाली अनेक वऱ्हाडी दबले गेले. अपघातानंतर घटनास्थळी किंकाळ्या, रक्ताचे डाग आणि वाहनांचा चुराडा पाहून नागरिकांच्याही अंगावर काटा आला.
दुचाकीस्वारांचा जागीच चेंदामेंदा
या भीषण धडकेत महामार्गावरून जात असलेली एक दुचाकीही कंटेनर आणि ट्रकच्या कचाट्यात सापडली. दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. अपघात इतका भयानक होता की काही मृतदेह बाहेर काढण्यासाठी बचाव पथकाला मोठी कसरत करावी लागली.
बचावकार्याला वेग, जखमींवर उपचार सुरू
अपघाताची माहिती मिळताच पोलीस, महामार्ग सुरक्षा पथक आणि स्थानिक प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले असून अनेकांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
क्षमतेपेक्षा जास्त प्रवास ठरला घातक?
प्राथमिक तपासात आयशर ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात वऱ्हाडी कोंबून नेले जात असल्याची बाब समोर आली आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन आणि भरधाव वेग या दोन्ही कारणांचा तपास पोलीस करत आहेत. अपघातानंतर महामार्गावर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.
“आनंदाच्या घरात शोककळा”
ज्या घरात साखरपुड्याच्या तयारीसाठी दिवे लावले गेले होते, त्या घरासमोरच मृत्यूचा थरार उभा राहिला. काही मिनिटांत आनंदाचे वातावरण आक्रोशात बदलले. नातेवाईकांचा हंबरडा आणि जखमींच्या किंकाळ्यांनी संपूर्ण परिसर सुन्न झाला.
पोलीसांनी अपघाताचा गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे

