आंबापाड्यात रक्तरंजित संघर्ष!शेतजमिनीच्या वादातून कुऱ्हाडी, लोखंडी रॉड आणि लाठ्यांचा मारा; १५ जणांविरुद्ध गुन्हे दाखलदरीपाडा-आंबापाडा हादरले; पिंपळनेर पोलिस ठाण्यात दोन्ही गटांकडून परस्परविरोधी फिर्यादी

फुले शाहू आंबेडकर
0

पिंपळनेर | प्रतिनिधी
साक्री तालुक्यातील दरीपाडा पैकी आंबापाडा येथे शेतजमिनीच्या जुन्या वादाने बुधवारी भीषण वळण घेतले. नांगरणीच्या कामावरून दोन गट आमनेसामने भिडल्याने परिसरात अक्षरशः रणकंदन माजले. कुऱ्हाडी, लोखंडी हत्यारे, लाठ्या-काठ्यांचा वापर करत एकमेकांवर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात दोन्ही गटांकडून दाखल झालेल्या फिर्यादींवरून तब्बल १५ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आंबापाडा शिवारातील गट क्रमांक ९० मध्ये सकाळच्या सुमारास नांगरणीचे काम सुरू असताना हा वाद चिघळला. पूर्वीपासून सुरू असलेल्या शेतजमिनीच्या तणावातून दोन्ही बाजूंमध्ये शाब्दिक चकमक झाली आणि काही क्षणांतच परिस्थिती हिंसक बनली.
“शेतात घुसून थेट हल्ला”
पहिल्या फिर्यादीत पद्माकर बापू गायकवाड यांनी नमूद केले आहे की, ते आपल्या चुलत भावासह शेतात नांगरणी करत असताना गावातील काही जण हातात कुऱ्हाड, लोखंडी रॉड आणि लाठ्या घेऊन शेतात घुसले. त्यानंतर कोणतीही चर्चा न करता संशयितांनी थेट हल्ला चढवत पद्माकर गायकवाड, त्यांचे चुलत भाऊ तसेच पत्नी वैशाली गायकवाड यांना मारहाण केली. या हल्ल्यात काही जण गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात आले. शिवीगाळ करत जीवे मारण्याच्या धमक्याही देण्यात आल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
या प्रकरणी गुलाब नामदेव गायकवाड, गोकुळ नामदेव गायकवाड, काशिनाथ नामदेव गायकवाड, शांताराम गोकुळ गायकवाड, धवळू काशिनाथ गायकवाड, रवींद्र गोकुळ गायकवाड, कमलबाई गोकुळ गायकवाड आणि सुनिता गुलाब गायकवाड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
“आमच्यावरच हल्ला झाला”
दरम्यान, दुसऱ्या गटाकडून गुलाब गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीत वेगळाच दावा करण्यात आला आहे. “तुमचे शेत जिथे आहे, तिथेच नांगरणी करा,” असे सांगितल्याचा राग मनात धरून विरोधी गटाने बेकायदेशीर जमाव जमवून आमच्यावर हल्ला केला, असा आरोप करण्यात आला आहे. लोखंडी पाईप, काठ्या आणि हाताबुक्क्यांनी मारहाण करून कुटुंबीयांना जखमी करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या प्रकरणी पद्माकर बापू गायकवाड, विलास रमण गायकवाड, किरण रमेश गायकवाड, अजय कैलास गायकवाड, संप्रती विलास गायकवाड, कविता पद्माकर गायकवाड आणि ताईबाई बापू गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गावात तणावपूर्ण शांतता
घटनेनंतर आंबापाडा परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून परिसरात लक्ष ठेवले आहे. जखमींवर उपचार सुरू असून पोलिसांकडून दोन्ही बाजूंच्या जबाबांची पडताळणी केली जात आहे.
पोलिस तपास सुरू
पिंपळनेर पोलिसांनी दोन्ही फिर्यादींवरून मारहाण, बेकायदेशीर जमाव, जीवे मारण्याची धमकी आणि प्राणघातक हल्ल्याचे विविध कलमांन्वये गुन्हे दाखल केले असून पुढील तपास सुरू आहे. पोलिसांकडून नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default