मालेगाव | प्रतिनिधी : नाशिक-धुळे राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी सकाळी थरारक आणि हृदयाचा ठोका चुकवणारी घटना घडली. शहादा आगाराची पुणे-शहादा ही एसटी बस चालकाला अचानक भोवळ आल्याने नियंत्रणाबाहेर जाऊन दोन मोठ्या झाडांवर आदळली आणि खोलगट भागात पलटी झाली. बसमध्ये तब्बल ६० प्रवासी प्रवास करत होते. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र चालकासह १३ जण जखमी झाले असून त्यातील दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे.
क्षणात घडला भीषण अपघात
मिळालेल्या माहितीनुसार, शहादा आगाराची पुणे-शहादा बस नियमित मनमाड-मालेगाव मार्गाऐवजी चांदवडमार्गे मालेगावकडे येत होती. चोंढी घाट परिसरात सुरू असलेल्या कामामुळे मार्गात बदल करण्यात आला होता. सकाळी साधारण ९ वाजण्याच्या सुमारास उमराणे गावापासून काही किलोमीटर अंतरावर बस पोहोचताच चालकाची प्रकृती अचानक बिघडली.
चालकाच्या केबिनजवळ उभ्या असलेल्या प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, चालकाला अचानक भोवळ आली आणि काही क्षणांतच बसवरील नियंत्रण सुटले. भरधाव बस रस्त्याच्या खाली उतरली, दोन झाडांवर जोरदार आदळली आणि पलटी होऊन खोलगट भागात जाऊन थांबली. अपघात होताच बसमध्ये भीषण आरडाओरड, गोंधळ आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले.
स्थानिक नागरिक देवदूत ठरले
अपघाताचा मोठा आवाज ऐकताच उमराणे परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. बस पलटी झाल्याने अनेक प्रवासी आत अडकून पडले होते. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून स्थानिकांनी विलंब न करता बसच्या काचा फोडल्या आणि एकामागोमाग एक प्रवाशांना बाहेर काढण्यास सुरुवात केली.
बसमध्ये ५८ प्रौढ आणि २ लहान मुले प्रवास करत होती. स्थानिकांच्या प्रसंगावधानामुळे मोठी जीवितहानी टळली. गंभीर जखमी चालकासह अन्य जखमींना तातडीने मालेगाव येथील सामान्य रुग्णालय तसेच खासगी रुग्णालयांत दाखल करण्यात आले.
वेग कमी असल्याने टळला मोठा अनर्थ
अपघाताच्या वेळी बसचा वेग मर्यादित असल्याने मोठी दुर्घटना टळल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. जर बस वेगात असती, तर मृतांचा आकडा मोठा असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अपघातात बसचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून पुढील तपास सुरू आहे.
पोलीस आणि प्रशासन घटनास्थळी
घटनेची माहिती मिळताच मालेगाव तालुका पोलीस, एसटी महामंडळाचे अधिकारी तसेच बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली. अपघाताची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून चालकाची वैद्यकीय तपासणी आणि तांत्रिक अहवालानंतर पुढील कारण स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मागील अपघाताच्या आठवणी ताज्या
विशेष म्हणजे, गेल्या वर्षीही उमराणे गावाजवळ मुरबाड आगाराच्या कल्याण-न्हावी बसला अशाच प्रकारचा अपघात झाला होता. त्या वेळी चालकाला डुलकी लागल्याने बस रस्त्याखाली जाऊन झाडावर आदळून पलटी झाली होती. त्या दुर्घटनेतही ३० प्रवाशांचे प्राण थोडक्यात बचावले होते. ताज्या घटनेने त्या अपघाताच्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या आहेत.
प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण
या भीषण घटनेनंतर प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून एसटी चालकांच्या आरोग्य तपासणीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. लांब पल्ल्याच्या प्रवासात चालकांच्या आरोग्याची नियमित तपासणी आणि विश्रांतीची योग्य व्यवस्था करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.

