धुळे हादरले! अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणातील दोन आरोपी 24 तासांत जेरबंद; मोबाईल बंद करून पळालेल्या आरोपींना गुजरात-नंदुरबारमधून अटक

फुले शाहू आंबेडकर
0

धुळे | प्रतिनिधी
धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात घडलेल्या अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार आणि आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित केल्याच्या अत्यंत गंभीर प्रकरणात पोलिसांनी अवघ्या 24 तासांच्या आत दोन फरार आरोपींना अटक करून मोठी कामगिरी बजावली आहे. आरोपींनी गुन्हा दाखल होणार असल्याची चाहूल लागताच मोबाईल फोन बंद करून पलायन केले होते. मात्र शिंदखेडा पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त तपासामुळे त्यांना अखेर बेड्या ठोकण्यात आल्या.
प्राप्त माहितीनुसार, शिंदखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप आहे. या घटनेदरम्यान आरोपीच्या साथीदाराने संपूर्ण प्रकार मोबाईलमध्ये चित्रित केल्याचे तपासात समोर आले. त्यानंतर संबंधित आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आल्याचा आरोप आहे.
या घटनेमुळे मानसिक धक्का बसलेल्या पीडित अल्पवयीन मुलीने टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती समोर आली असून, त्यामुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
 गंभीर कलमांखाली गुन्हा
पीडितेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिंदखेडा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 64(1)(i), 351(2), 3(5) तसेच POCSO कायदा 2012 मधील कलम 4, 8, 12, 15 आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 अंतर्गत कलम 66(E), 67(B) यांसह वाढीव कलम 107 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 मोबाईल बंद करून पलायन; पोलिसांसमोर आव्हान
गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती मिळताच दोन्ही आरोपींनी त्यांचे मोबाईल बंद करून ठिकाण बदलल्याने तपास यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे राहिले. तांत्रिक तपासातून कोणतेही लोकेशन मिळत नसल्याने पोलिसांनी पारंपरिक तपास पद्धतीचा अवलंब केला.
पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदखेडा पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेची स्वतंत्र पथके तयार करण्यात आली. चिमठाणे परिसरातील नागरिक, साक्षीदार आणि विविध संपर्कांच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरविण्यात आली.
 गुजरात ते नंदुरबार... आरोपींचा शोध अखेर लागला
उपनिरीक्षक किशोर जाधव यांच्या पथकाने अथक पाठपुरावा करत मुख्य आरोपी संदीप रमेश कंखर (धनगर) याला बडोदा (गुजरात) येथून ताब्यात घेतले. तर दुसरा आरोपी भावेश सुनील गागरे याला नंदुरबार परिसरातून अटक करण्यात आली.
दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन पुढील चौकशी सुरू असून या प्रकरणातील डिजिटल पुरावे, व्हिडिओ प्रसारणाचे स्रोत आणि इतर संबंधित बाबींचा सखोल तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
समाजासाठी इशारा
अल्पवयीन मुलांवरील लैंगिक अत्याचार, त्यांचे चित्रीकरण आणि सोशल मीडियावर प्रसारण हे गंभीर आणि अमानवी स्वरूपाचे गुन्हे आहेत. अशा घटनांमुळे पीडित आणि त्यांच्या कुटुंबावर दीर्घकालीन मानसिक परिणाम होतात. त्यामुळे अशा गुन्ह्यांविरोधात कठोर कारवाई आणि सामाजिक जागरूकता ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
फुले शाहू आंबेडकर वृत्तपत्र | क्राईम स्पेशल रिपोर्ट

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default