धुळे | प्रतिनिधी
धुळे तालुक्यातील निकुंभे गावात खुनाच्या घटनेनंतर संतप्त झालेल्या जमावाने कायदा हातात घेत आरोपीच्या घरावर तुफान दगडफेक आणि मोडतोड केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मयत शेतकऱ्याची अंत्ययात्रा सुरू असताना अचानक उसळलेल्या संतापामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले. या प्रकरणी पोलिसांनी आता अनेक जणांविरोधात दंगलीसह विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, निकुंभे गावातील शेतकरी शानाभाऊ शंभू पाटील (वय ५०) यांच्यावर किरकोळ वादातून जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. आरोपी दशरथ किसन ठाकरे याने लोखंडी सळईने शानाभाऊ पाटील यांच्या डोक्यावर जबर मारहाण केली. गंभीर जखमी झालेल्या पाटील यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवल्याने या घटनेचे रूपांतर खुनाच्या गुन्ह्यात झाले.
घटनेनंतर आरोपी दशरथ ठाकरे फरार झाला होता. त्याच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग (एलसीबी) आणि सोनगीर पोलीस ठाण्याच्या पथकाने विशेष मोहीम राबवली. अखेर धुळे तालुक्यातील मेहरगाव परिसरातील जंगलातून आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले.
अंत्ययात्रेत उसळला संताप
दरम्यान, मयत शानाभाऊ पाटील यांची अंत्ययात्रा निकुंभे गावातून काढण्यात आली. अंत्ययात्रा आरोपीच्या वस्तीजवळ पोहोचताच वातावरण अचानक तापले. अंत्ययात्रेत सहभागी असलेल्या काही संतप्त नागरिकांनी आरोपीच्या घरावर मोठ्या प्रमाणात दगडफेक सुरू केली.
दगडफेकीदरम्यान घराच्या परिसरातील साहित्य, घराबाहेर ठेवलेल्या वस्तू आणि इतर मालमत्तेचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. काही वेळ परिसरात भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. गावकऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली होती.
पोलिसांचे आवाहन धुडकावले
खुनाच्या घटनेनंतर गावातील परिस्थिती संवेदनशील असल्याने पोलिसांनी मयताच्या नातेवाईकांना आणि ग्रामस्थांना शांतता राखण्याचे आवाहन केले होते. कोणत्याही परिस्थितीत कायदा हातात घेऊ नये, असे वारंवार सांगण्यात आले होते. मात्र भावनिक वातावरणात काही जणांनी संतापाच्या भरात थेट आरोपीच्या घरावर हल्ला चढविल्याचे समोर आले.
वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी
दगडफेकीची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी, सोनगीर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि मोठा पोलीस बंदोबस्त तातडीने निकुंभे गावात दाखल झाला. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत पुढील अनर्थ टाळला. त्यानंतर संपूर्ण घटनेची चौकशी सुरू करण्यात आली.
१५ जणांविरोधात दंगलीचा गुन्हा
या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर चेतन शांतीलाल पाटील, ज्ञानेश्वर निंबा मोरे, शांतीलाल हरी पाटील, राजपाल गिरासे, शांतीलाल कोळी, रतिलाल मोरे, गणेश पाटील, समाधान खंडेकर, नामदेव कोळी, राजेंद्र पानपाटील, भानुदास मोरे, मनोहर पाटील, आनंदा पानपाटील, जगदीश खंडेकर, रतिलाल पाटील आणि भुरा पानपाटील यांच्यासह संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १८९(२), १९०, १९१(२), २१५, २२१, ३२४(४) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१)(३) अन्वये दंगलीसह विविध गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.
गावात अजूनही तणाव कायम
खुनाच्या घटनेनंतर आरोपीची अटक झाली असली तरी त्यानंतर झालेल्या दगडफेक प्रकरणामुळे निकुंभे गावात अजूनही तणावाचे वातावरण कायम आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी गावात अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
"एकीकडे खुनाचा तपास, दुसरीकडे दंगलीची कारवाई"
निकुंभे गावात घडलेल्या या दुहेरी घटनांमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून खुनानंतर उसळलेल्या संतापाने कायदा-सुव्यवस्थेपुढे नवे आव्हान निर्माण केले आहे. आता खुनाच्या गुन्ह्यासह दगडफेक आणि दंगलीच्या प्रकरणाचा तपासही वेगाने सुरू आहे.

