सारळ (अलिबाग) येथील इनर सर्कल सोसायटीवर रायगड पोलिसांची मोठी कारवाई; अमली पदार्थविरोधी मोहिमेला मिळाली नवी धार
रायगड | प्रतिनिधी
अलिबाग तालुक्यातील सारळ येथील एका हायप्रोफाईल सोसायटीत सुरू असलेल्या कथित गांजा पार्टीवर रायगड पोलिसांनी पहाटेच्या सुमारास धडक छापा टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईत गांजा सेवन करताना दोन जणांना रंगेहाथ पकडण्यात आले असून, त्याच ठिकाणी व्हिसाची मुदत संपल्यानंतरही भारतात वास्तव्यास असलेल्या एका युक्रेनियन महिलेविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
रायगड जिल्हा पोलिसांनी अमली पदार्थांविरोधात सुरू केलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. रविवार (दि. १४ जून) रोजी पहाटे स्थानिक गुन्हे शाखा आणि मांडवा सागरी पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने सारळ येथील 'इनर सर्कल सोसायटी' मधील बी-०६ क्रमांकाच्या फ्लॅटवर अचानक छापा टाकला.
गांजा सेवन करताना दोघे रंगेहाथ
पोलीस पथक फ्लॅटमध्ये दाखल होताच तेथे काही व्यक्ती पार्टी करत असल्याचे निदर्शनास आले. यावेळी दोन व्यक्ती कागदी नळीमध्ये भरलेला पदार्थ पेटवून त्याचा धूर ओढत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी तत्काळ त्यांना ताब्यात घेत चौकशी केली असता ते गांजा या अमली पदार्थाचे सेवन करत असल्याचे उघड झाले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे सुनील बळीराम चावला (वय ६९, रा. सारळ, अलिबाग) आणि हरेंद्र सिंग मंगल सिंग (वय ६५, रा. वरळी, मुंबई) अशी आहेत.
पंचांसमक्ष करण्यात आलेल्या झडतीमध्ये गांजा भरलेल्या कागदी नळ्या, अर्धवट जळालेली गांजाची नळी आणि लायटर असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या गांजाचे एकूण वजन सुमारे ३ ग्रॅम असल्याचे पोलिसांनी सांगितले.
एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा
या प्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध अंमली पदार्थ व मनःप्रभावी पदार्थ अधिनियम (NDPS Act), 1985 अंतर्गत कलम ८(क), २०(ब) आणि २७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित कलमांनुसार अमली पदार्थांचे सेवन, बाळगणे अथवा त्यासंबंधित बेकायदेशीर कृत्ये गंभीर स्वरूपाचा गुन्हा मानली जातात.
युक्रेनियन महिला पोलिसांच्या रडारवर
छाप्यादरम्यान फ्लॅटमध्ये उपस्थित असलेल्या एका युक्रेनियन महिलेची कागदपत्रे पोलिसांनी तपासली. त्यावेळी तिचा भारतातील वास्तव्यासाठीचा व्हिसा दोन दिवसांपूर्वी म्हणजेच १२ जून २०२६ रोजी संपुष्टात आल्याचे आढळून आले.
व्हिसाची मुदत संपल्यानंतरही भारतात वास्तव्यास राहण्यासाठी आवश्यक वैध कागदपत्रे उपलब्ध नसल्याने संबंधित महिलेविरुद्ध इमिग्रेशन अँड फॉरेनर्स अॅक्ट, २०२५ मधील कलम २३(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपासानुसार तिच्या वास्तव्यासंदर्भातील इतर बाबींचीही चौकशी केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
रायगड पोलिसांची नियोजनबद्ध कारवाई
ही धडक कारवाई रायगडच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल, अप्पर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी माया मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
कारवाईमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे, मांडवा सागरी पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक सोमनाथ लांडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, फौजदार व पोलीस कर्मचाऱ्यांच्या विशेष पथकाने सहभाग घेतला.
रायगड पोलिसांचे नागरिकांना आवाहन
जिल्ह्यात कुठेही अमली पदार्थांची विक्री, सेवन किंवा साठवणूक होत असल्याची माहिती मिळाल्यास नागरिकांनी तात्काळ पोलिसांना कळवावे. माहिती देणाऱ्यांची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल, असे आवाहन रायगड पोलिसांनी केले आहे.
महत्त्वाची कायदेशीर नोंद
सदर व्यक्तींविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरणाचा तपास सुरू आहे. न्यायालयाकडून दोष सिद्ध होईपर्यंत कोणत्याही आरोपीला दोषी ठरविण्यात आलेले नाही.

