जळगावमध्ये आहे आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था; वाचा ‘ग.स.’ स्पेशल

फुले शाहू आंबेडकर
0
जळगाव जिल्ह्यासह राज्यातील अनेक पतसंस्था बुडल्या किंवा बुडवल्या गेल्या. पतसंस्थांमधील कोट्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचारामुळे सर्वसामान्य गुंतवणुकदार होरपळले गेले. अशा नकारात्मक परिस्थितीमुळे जळगाव जिल्ह्याचे नाव राज्यभर बदनाम झाले असले तरी दुसर्‍याबाजूला जळगाव जिल्ह्यातील एका पतसंस्थेच्या कामामुळे जळगावचे नाव केवळ राज्य किंवा राष्ट्रीय पातळीवरच नव्हे तर थेट आशिया खंडात गौरविले जात आहे.आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था अशी ओळख असलेल्या जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी लि. अर्थत ग.स. सोसायटीची (G S Society Jalgaon) वाटचाल नाबाद १०० वर सुरू आहे. आजमितीस संस्थेचे ३४ हजार ९०० सभासद असून संस्थेकडे तब्बल १००० कोटींच्यावर खेळते भांडवल आहे. यावरून संस्थेची सहकार क्षेत्रातील ग.स.च्या वैभवाची प्रचिती येते…सन १९०६ मध्ये सरकारी कामकाजाच्या वाढत्या व्यापामुळे त्यावेळच्या खान्देश विभागाची कामकाजाची सुसंगती निर्माण व्हावी म्हणून तत्कालीन सरकारने पुर्व खान्देश पश्चिम खान्देश असे खान्देशचे दोन भाग केले. धुळे येथील मुख्य केंद्राची विभागणी होऊन पुर्व खान्देश जिल्ह्याचे मुख्यालय जळगाव येथे करण्यात आले. शासनातील कार्यालयीन कामकाजाच्या विभागणी बरोबर नोकर वर्गाची देखील विभागणी होऊन बराचश्या नोकरवर्गाच्या दृष्टीने जळगाव हे त्यांना नवीनच होते. त्यामुळे या भागात ना कोणाशी ओळख ना परिचय सर्वच अनोळखी असल्यामुळे घर भाड्याने मिळविणे, आर्थिक अडचणींच्या प्रसंगी मदत मिळविणे, दुकानदारांकडून उधारीने माल मिळविणे इत्यादी दैनंदिन संसार चालविण्यात नानाविधी समस्यांचा या बदलून आलेल्या नोकरवर्गासमोर मोठाच प्रश्न उभा राहीला.आपल्या दैनंदिन अडचणी निवारण करण्याचा प्रयत्न नोकरवर्गाने सुरु केला. त्यावेळेस नुकताच सन १९०४ मध्ये हिंदुस्थानच्या सहकारी पतपेढीचा कायदा पारित झालेला होता. त्यावेळी सरकारने केलेल्या कुठल्याही सुधारणा अगर कायदे हे प्रामुख्याने सरकारी अधिकार्‍यांमार्फत अंमलात आणले जात होते. त्यामुळे सर्व साधारण जनतेपेक्षा या सुधारणांची अथवा कायद्याची खरी जाणीव व माहिती सरकारी नोकरांनाच विशेषततत्वाने होती. त्यामुळे जळगाव येथील सरकारी नोकरांचे आपल्या वैयक्तीक आर्थिक अडचणी सोडविण्यासाठी अनेक प्रयत्न झाले. त्या प्रयत्नांमधुनच सन १९०४ च्या सहकारी कायद्यान्वये पगारदार नोकरांची सहकारी पतपेढी स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्याची परिणीती म्हणून १५ डिसेंबर १९०९ रोजी पूर्व खान्देश सहकारी नोकरांची म्युचुअल हेल्प आणि प्रॉव्हीडंड फंड को-ऑप. सोसायटी जळगावची स्थापना करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default