राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एक व्हिडिओ ट्वीट केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु कोण हे आदरणीय पवार साहेबांनी स्पष्टपणे आपल्या भाषणात सांगितले आहे. ते म्हणतात,“जे लोक सांगतात की रामदास शिवाजी महाराजांचे गुरु होते, ते खोटं... रामदास शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते. शिवाजी महाराजांचे गुरु राजमाता जिजामाता होत्या.’
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे, ‘खरा इतिहास माहीत करून न घेता आपला अजेंडा रेटण्यासाठी खोटा इतिहास सांगून छत्रपतींचा अपमान केला जात असेल तर हे नक्कीच निषेधार्ह आहे आणि असं होत असताना गप्प बसणं हे त्याहून अधिक निषेधार्ह आहे. राजमाता जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराजांनी सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून, सर्वांना सोबत घेत आदर्श राज्यकारभार केला. सर्वसामान्य जनतेचं हित, हीच त्यांची निती आणि शिकवण होती. खोटा इतिहास सांगून थोर महापुरुषांचा खरा इतिहास पुसण्याचे प्रयत्न देशात इतरत्र यशस्वी होत असतीलही, परंतु महाराष्ट्रात असले प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाहीत, हे सर्वांनीच लक्षात ठेवावं.’
