
महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेते भ्रष्टाचारात अडकले असून जनतेचा आघाडी सरकारमधील नेत्यांवर विश्वास राहिलेला नाही. चार राज्यात यश मिळाले. आता मिशन महाराष्ट्र आहे. २०२४ मध्ये राज्यात स्वबळावर भाजपचे सरकार सत्तेत येईल, असा विश्वास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. यावर शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शरद पवारांकडून भाजपाचं कौतुक; नेत्यांना म्हणाले “प्रतिस्पर्धी असले तरी त्यांच्यांकडून…”
गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपाने पहिल्यांदा बहुमतापर्यंत मजल मारली. या विजयाचे शिल्पकार फडणवीस यांचे गुरुवारी सकाळी नागपुरात आगमन होताच त्यांचे विमानतळावर स्वागत करण्यात आले. यावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. गोव्यात यश मिळाल्याने महाराष्ट्रातील जनतेचा भाजपावर विश्वास बसला आहे. वर्तमान राज्य सरकार हे घोटाळाबाजांचे सरकार आहे. रोज नवनवीन घोटाळे आणि गैरव्यवहाराची प्रकरणे समोर येत असल्याने सरकार कोंडीत सापडले आहे. माझ्याकडे आघाडीतील आणखी काही नेत्यांच्या विरोधात पुरावे आहेत. योग्य वेळी ते बाहेर काढण्यात येतील. गोव्यातील यशानंतर आगामी महापालिका, जिल्हा परिषद व पुढे २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पूर्ण बहुमताने भाजपची सत्ता येईल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.
राऊत काय म्हणाले?
“फार चांगली गोष्ट आहे. गोवा जिंकून आल्यापासून त्यांचं मनोबल वाढलं आहे. गोवा काय आहे हे त्यांना लवकरच कळेल. गोवा पोर्तुगीज आणि इंग्रजांनाही कळला नाही. अनेक राजकीय पक्षांनाही गोवा काय आहे आणि गोव्याचं राजकारण कळलं नाही. गोवा जिंकल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढला असेल तर माझ्या शुभेच्छा आहेत. राजकीय कार्यात त्यांनी स्वत:ला वाहून घ्यावं,” असं संजय राऊत मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले.

भाजपाचा रंग बनावट असून त्यांचे रंग भेसळयुक्त आहेत अशी टीका शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी केली आहे. केंद्रीय तपास यंत्रणांना आम्ही घाबरत नाही याचा पुनरुच्चार त्यांनी केला. तसंच राज्यात पुन्हा भाजपाची सत्ता येणार नाही या शरद पवारांच्या भूमिकेला त्यांनी दुजोरा दिला. भाजपाचे नेते पाठीमागून वार करतात अशी टीका यावेळी त्यांनी केली. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
“भाजपाला कोणीही घाबरत नाही. जर भाजपा केंद्रीय तपास यंत्रणा, खोटे आरोप, चिखलफेक करुन महाविकास आघाडीचे आमदार, खासदार, नेते यांचं मनोबल खाली आणण्याचा प्रयत्न करत असतील तर ते चुकीचं आहे, असं होणार नाही. शरद पवार यांनी जो विश्वास दिला आहे की, घाबरु नका मी भाजपा पुन्हा महाराष्ट्रात येऊ देणार नाही ही फक्त राष्ट्रवादी काँग्रेस नाही तर महाविकास आघाडीच्या वतीनेही त्यांनी भूमिका मांडली आहे. महाविकास आघाडीचे प्रमुख नेते म्हणून त्यांनी तरुण आमदारांसमोर भूमिका मांडली आहे,” असं संजय राऊत म्हणाले.
