ऊस तोडताना जुळविला विवाह, लग्नही झाले; पण अडीच महिन्यांनंतर...
शुक्रवार, मार्च १८, २०२२
0
ऊस तोडणीच्या कामासाठी बाहेरगावी गेलेल्या कुटुंबाने तेथेच आपल्या मुलीसाठी सोयरिक जुळविली. विवाहही लावून दिला. मात्र, ही गोष्ट जेव्हा गावाकडील नातेवाईकांना कळाली, तेव्हा त्यांनी ती मुलगी अल्पवयीन असल्याचे सांगत पोलिसांत धाव घेतली. त्या मुलीने अडीच महिने संसार केल्यानंतर आता तिच्या माहेर आणि सासरच्या लोकांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.नगर शहराजवळील निंबोडी या गावातील शेतमजूर कृष्णा छगन साळुंखे ऊस तोडणीच्या कामासाठी कर्जत तालुक्यातील तोरकडवाडी येथे गेले होते. तेथे त्यांची ओळख अर्जुन गोरे यांच्यासोबत झाली. यातून तिथेच साळुंखे यांच्या अल्पवयीन मुलीचा विवाह जुळविण्यात आला. ७ जानेवारी २०२२ रोजी अल्पवयीन मुलगी आणि दादा अर्जुन गोरे यांचा विवाह तोरकडवाडी येथे गोरे यांच्या घरातच साध्या पद्धतीने लावून देण्यात आला.
काही काळाने ही घटना निंबोडी येथे साळुंखे यांच्या नातलगांना समजली. ज्या मुलीचा विवाह झाला, ती अल्पवयीन आहे. त्यामुळे नातलगांनी नगर शहरातील भिंगार कम्प पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार केली. पोलिसांनी हे प्रकरण बाल न्याय मंडळाकडे पाठविले. न्यायालयाने कायद्यातील तरतुदीनुसार कर्जत तालुक्यातील तोरकडवाडी येथील ग्रामसेवकांना खातरजमा करून फिर्याद देण्याचा आदेश दिला. त्यानुसार ग्रामसेवक जालिंदर गणपत पठाडे यांनी कर्जत पोलिस स्टेशनमध्ये १७ मार्च २०२२ रोजी फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी कृष्णा छगन साळुंखे (रा. निंबोडी), दादा अर्जुन गोरे, अर्जुन गोरे (रा. तोरकडवाडी, ता. कर्जत) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Tags
