पाच राज्यांच्या निवडणुकीमध्ये भाजपाने जोरदार मुसंडी मारलीय. उत्तर प्रदेशमधील सत्ता भाजपा राखणार हे जवळजवळ स्पष्ट झालं असलं तरी दुसरीकडे गोवा, उत्तराखंड आणि मणिपूरमध्येही कमळ फुलणार असल्याचं चित्र दिसत आहे. मात्र त्याचवेळी मागील काही निवडणुकांप्रमाणे ही निवडणुकही काँग्रेसला धक्का देणारी ठरली असून पंजाबमधील सत्ता आपच्या हाती गेल्यात जमा आहे. गोव्यामध्येही त्रिशंकु परिस्थिती असली तर भाजपा राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा करणार असल्याचं सांगितलं जातंय. भाजपाच्या या दमदार कामगिरीनंतर राज्यातील भाजपा नेत्यांनी उत्तर प्रदेश आणि गोव्यात निवडणूक लढवणाऱ्या शिवसेनेवर निशाणा साधलाय. भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी ट्विटरवरुन शिवसेनेवर टीका केलीय.
पंजाबमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या आपचा विजय झाल्यानिमित्त त्यांचा शिवसेना भवनात सत्कार होईल असा उपरोधिक टोला शेलार यांनी लगावलाय. “अरविंद केजरीवालांचा आता बहुतेक शिवसेना भवनात जंगी सत्कार होईल. शिवाजी पार्कमध्ये हत्तीवरून युवराज साखर सुध्दा वाटतील. शेजाऱ्यांच्या घरात पाळणा हलला की पेढे वाटपाचे कार्यक्रम करुन दाखवले जातात, आपले नाही धड अन शेजाऱ्याचा कढ!” असा टोला शेलार यांनी ट्विटमधून लगावलाय
अन्य एका ट्विटमध्ये शेलार यांनी, ” इसवी सन २०२४ साली दिल्लीच्या खुर्चीत बसणार… उत्तर प्रदेश, गोव्यात बघा आम्ही करुन दाखवतो.. उत्तर प्रदेशात युवराजांची अती विराट सभा…झंझावाती दौरा… सगळ्या बुडबुड्यांचे निकाल लागले…अती प्रचंड मतांनी झंझावाती डिपॉझिट गुल
हारले.. एक मासो आणि खंडी भर रस्सो!” असा टोला शिवसेनेला लगावला आहे.
पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीचे प्राथमिक कल हाती आले असून उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा योगी सरकार सत्तता काबिज करेल असं चित्र दिसत आहे. तर दुसरीकडे पंजाबमध्ये आपचा मुख्यमंत्री बसेल असं चित्र प्राथमिक कल दर्शवत आहेत. गोव्यामध्ये त्रिशंकू तर उत्तराखंड आणि मणिपूरमध्ये कमळ फुलण्याची चिन्हं दिसत आहेत. हे प्राथमिक कल सध्या तरी काँग्रेससाठी फारच धक्कादायक ठरत असून पंजाबसारख्या महत्वाच्या राज्यामधील सत्ताही काँग्रेसच्या हातून जाणार असं चित्र दिसतंय. मात्र पंजाबमधील सत्ता गेल्यास देशात काँग्रेस पाच राज्यांपुरतीच मर्यादित राहणार आहे. तर भाजपा गोव्यामध्ये युतीच्या माध्यमातून सत्ता असणाऱ्या राज्यांची संख्या कायम ठेवण्याची शक्यता अधिक आहे.
