राजापुरातील बेपत्ता सलून व्यावसायिकाचा खून झाल्याचे उघडकीस

फुले शाहू आंबेडकर
0
राजापूर :  शहरातील चव्हाणवाडी येथून काल रात्रीपासून बेपत्ता झालेल्या सलून व्यावसायिक राजेश वसंत चव्हाण ( वय ४० वर्षे, रा. चव्हाणवाडी, राजापूर) यांचा खून झाला असल्याचे उघडकीस आले आहे.   गावाजवळ रानतळे येथील सडय़ावर मंगळवारी संध्याकाळी चव्हाण मृतावस्थेत आढळून आले. त्यांच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर मारहाणीच्या खूणा असल्याने घातपाताचा संशय व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार चव्हाणवाडी येथील सलून व्यावसायिक राजेश चव्हाण सोमवारी रात्री उशीरापर्यंत घरी न आल्याने कुटुंबियांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र ते कोठेही आढळून आले नाहीत. अखेर मंगळवारी सकाळी त्यांच्या पीने राजापूर पोलिस स्थानकात बेपत्ता म्हणून फिर्याद दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी शोध घेतला असता चव्हाण यांचे शेवटचे मोबाईल लोकेशन रानतळे येथे मिळाले. म्हणून त्या परिसरात शोध घेतला तेव्हा रानतळे पिकनिक स्पॉटपासून काही अंतरावर त्यांचा मृतदेह आढळून आला.  या प्रकाराची माहिती मिळताच राजापूर पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक मधुकर मौळे व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. तेथे चव्हाण यांच्या डोक्याच्या मागच्या बाजूला आणि चेहऱ्यावर जोरदार मार लागला असल्याचे दिसून आले. तसेच त्यांचा चेहरा रक्ताने माखलेल्या स्थितीत होता. मृतदेहापासून काही अंतरावर त्यांचा मोबाईल फोन फोडलेल्या अवस्थेत आढळून आला. तर मृतदेहाजवळ ग्लास व खाद्यपदार्थही आढळून आले. त्यामुळे चव्हाण यांचा खून झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.  चव्हाण सलून व्यावसायिक म्हणून परिचित होते. पूर्वी त्यांचे जकातनाका येथे केस कापण्याचे दुकान होते. आठ दिवसांपूर्वीच त्यांनी राजापूर ग्रामीण रूग्णालयासमोरील गाळ्यामध्ये नवीन सलून दुकान सुरू केले होते. त्यामुळे या प्रकारामागील कारणाबाबत पोलीस बुचकळ्यात पडले आहेत. रानतळे येथील वस्तीलगत हा प्रकार घडल्याने राजापुरात एकच खळबळ उडाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default