कायदा-सुव्यवस्था बिघडवण्याचा राणा दाम्पत्याचा कट ; जामिनाला विरोध करताना मुंबई पोलिसांचा दावा

फुले शाहू आंबेडकर
0

राज्यातील विरोधी पक्ष असलेला भाजप आणि ठाकरे यांचे अन्य राजकीय विरोधक त्यांना हिंदूविरोधी दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खासगी निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा पठणाचा खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांचा आग्रह सामान्य वाटत असला तरी प्रत्यक्षात महाविकास आघाडी सरकारला आव्हान देण्यासाठी आणि मुख्यमंत्री हिंदूविरोधी असल्याचे दाखवण्याचा त्यांचा हेतू होता. राज्यातील कायदा-सुव्यवस्थेची घडी विस्कटल्याचे दाखवून राज्यपालांकरवी सरकार बरखास्त करण्याचा राणा दाम्पत्य आणि भाजपा कट होता, असा दावा मुंबई पोलिसांतर्फे शुक्रवारी राणा दाम्पत्याच्या जामिनाला विरोध करताना करण्यात आला.
प्रक्षोभक वक्तव्य आणि सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी अटकेत असलेल्या राणा दाम्पत्याने सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे. त्यांच्या अर्जावर विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी शुक्रवारी लेखी उत्तर दाखल केले.
राज्यातील विरोधी पक्ष असलेला भाजप आणि ठाकरे यांचे अन्य राजकीय विरोधक त्यांना हिंदूविरोधी दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या राजवटीत हिंदूंना त्यांच्या धर्माचे मुक्तपणे आचरण करणे कठीण होऊन बसल्याचे चित्र राणा दाम्पत्य आणि भाजपकडून निर्माण केले जात आहे, असा दावाही पोलिसांनी केला आहे.
राणा दाम्पत्यावरील कारवाईसाठी संबंधित यंत्रणेच्या मंजुरीचा प्रश्न हा तपास पूर्ण झाल्यावर येतो, असेही पोलिसांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. राणा समाजातील प्रभावशाली व्यक्ती आहेत. त्यामुळे त्यांना जामीन मंजूर केल्यास ते पुरावे नष्ट करण्याची आणि साक्षीदारांवर दबाव आणण्याची शक्यता आहे, असा दावा करून पोलिसांनी राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जाला विरोध केला.
कायदा आणि सुव्यवस्थेचा भंग करण्याचा वा संविधानाविरूद्ध असंतोष निर्माण करणारे वक्तव्य केले जाते  तेव्हा राजद्रोहाचा आरोप ठेवला जातो. राणा दाम्पत्यानेही नागरिकांमध्ये द्वेष, शत्रुत्व आणि शत्रुत्वाची भावना निर्माण केली, असा दावा पोलिसांनी केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default