पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विवेकानंदनगर क्रमांक २ मध्ये संदीप गोंगे हा आई आणि इतर नातेवाईकांसोबत राहत होता. आई आजारी असल्यामुळे तिची सेवा करण्यासाठी श्रीरामपूर येथे राहणारी त्याची बहीण शोभा गारुडकर ही काही महिन्यापूर्वी मनमाडला आली होती. संदीप हा व्यसनी होता. तो शोभाला नेहमीच त्रास देत असे. येथे आल्यावर त्याचा त्रास वाढला होता. रोज काहीही कुरापत काढून तो तिला शिवीगाळ करून कधी कधी मारहाण देखील करायचा.
कोरोना काळात शोभाच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे तिच्यावर दुःखाचे डोंगर कोसळले असताना संदीपचा त्रास कमी होण्याऐवजी आणखी वाढला होता. आज दुपारी ती जेवण करीत असताना संदीपने तिला शिवीगाळ करून मारहाण केली. सततच्या त्रासाला कंटाळून अखेर शोभाने टोकाचे पाऊल उचलत संदीपच्या पोटावर चाकूने सपासप वार केले. घाव वर्मी लागल्यामुळे संदीप रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक समीरसिंग साळवे, सहायक निरीक्षक प्रल्हाद गीते, उपनिरीक्षक पी. डी. सरोवर घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी आरोपी शोभा विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
