शिरपूर येथे कारला ओव्‍हरटेक करून अडवत दीड लाखांची लूट

फुले शाहू आंबेडकर
0
शिरपूर (धुळे) : कारला ओव्हरटेक करुन अडवून कारचालकाला धक्काबुक्की करीत दागिने व रोकड असा सुमारे दीड लाखांचा मुद्देमाल लुटल्याची घटना शुक्रवारी (ता.१३) रात्री अकराला शहरातील निमझरी नाका येथील उंदरी नाल्यावरील पुलावर घडली. लूट (Crime News) करुन संशयित फरारी झाले. त्यातील एकाची ओळख पटली आहे. 
राजेंद्र नारायण पवार (वय ५७, रा.करवंद नाका) यांच्यासोबत हा (Dhule News) प्रकार घडला. त्यांच्या मालकीचे करवंद नाका परिसरात अमोल मेडिकल स्टोअर्स आहे. १३ मेस सायंकाळी त्यांची भाची पल्लवी पाटील हिच्या हळदीच्या कार्यक्रमासाठी ते पत्नी, सून, भाऊ व दोन वहिनी यांना घेऊन कार (क्र. एमएच १८ बीसी २१५१) ने विखरण (ता. शिरपूर) येथे गेले होते. विखरण येथून रात्री साडेदहाला ते शिरपूरला परत येण्यासाठी निघाले. रात्री अकराला वाघाडी टी पॉइंट येथून वळण घेतल्यावर त्यांना एक कार त्यांचा पाठलाग करीत असल्याचे आढळले. पवार यांनी कार शिरपूरकडे वळवली.

धक्‍काबुक्‍की करत लुटले

उंदरी नाल्यावरील पुलावर पलिकडे देवमोगरा कॉलनीच्या फलकाजवळ त्यांच्या कारला ओव्हरटेक करीत दुसरी कार (एमएच १५ इएक्स ०६०६) तिरकस उभी राहिली. कारमधून उतरलेल्या संशयिताने हुज्जत घातली. त्यावर संशयिताने झटापट करुन त्यांच्या चार तोळे वजनाची सोन्याची साखळी ओरबाडली. त्यांचा खिसा फाडून त्यातील तीन हजार रुपये काढून घेतले. संशयिताच्या साथीदारांनी पवार यांच्या भावालाही धक्काबुक्की करुन त्यांच्या वहिनीच्या गळ्यातील मंगलपोत ओरबाडण्याचा प्रयत्न केला. एक लाख ४३ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल संशयितांनी लुटला. दरम्यान पवार यांनी चौकशी केली

असता संशयितांमध्ये सागर राजेंद्र पाटील (रा. शिरपूर) याचा समावेश असल्याची माहिती मिळाली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलिस ठाण्यात सागर पाटीलसह एकूण तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default