केंद्र सरकारने नुकताच इंधनावरील उत्पादन शुल्कात कपात केली आहे. पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात 5 रूपयांनी तर डिझेलवरील शुल्कात 10 रूपये कमी झाले आहेत. मात्र या इंधन कपातीचा गोंधळ आवरत नाही; तोच भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लिमीटेडचा पेट्रोल पंपांवर डिझेलचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवत असल्याने बीपीसीएलचे पंपधारक हैराण झाले आहेत. चाळीसगाव परिसरात गेल्या चार– पाच दिवसांपासून अशी समस्या निर्माण झाली आहे. या डिझेल तुटवड्याचा फटका ग्राहकांना बसत आहे. डिझेलसाठी पानेवाडी येथे अगावू पैसे देवूनही टँकर चार चार दिवस मिळत नाही. त्यामुळे पंप बंद ठेवण्याची वेळ पंपचालकांवर आली आहे.
वाहनधारकांना बसतोय फटका
चाळीसगाव शहर व परिसरात भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लिमीटेड, हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमीटेड, इंडियन ऑईल कार्पोरेशन लिमीटेड यांचे पंप आहेत. मात्र गेल्या पाच सहा दिवसांपासून विशेषकरून बीपीसीएलच्या कंपनीद्वारे इंधन पुरवठ्यात अनियमीतता दिसून येत आहे. मनमाड येथील पानेवाडी डेपोवरून खान्देशातील बीपीसीएलच्या पंपधारकांना पेट्रोल व डिझेल मिळते. मात्र यात गेल्या चार पाच दिवसापासून नियमीततेचा अभाव आहे. परिणामत: डिझेल अभावी पेट्रोलपंप चालकांना पंप बंद ठेवावे लागत आहेत. त्याचा फटका पंप धारकांना बसत आहे. पण चारचाकी वाहन धारक तसेच व्यावसायीक वाहनधारकांना देखील बसत आहे.
