औंढा नागनाथ तालुक्यातील ग्रामपंचायतीकडून कोणताही प्रस्ताव आणि कामांची मागणी नसताना पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी परस्पर मान्यता दिली होती. गटविकास अधिकारी, अभियंता, सहाय्यक लेखाधिकारी कंत्राटी कर्मचारी आदींनी संगणमत करून बनावट मजुरांच्या खात्याद्वारे तब्बल 26 लाख रुपये उचलण्यात आले होते. या गैरव्यवहाराला गोजेगाव ग्रामपंचायतीने वाचा फोडली होती. जिल्हा परिषदेने या गैरव्यवहार प्रकरणी चौकशी पथक नेमले होते.
दरम्यान, चौकशी पथकाच्या चौकशीअंती औंढा नागनाथ पंचायत समितीचे तत्कालीन प्रभारी गटविकास अधिकारी जगदीश साहू, सहाय्यक लेखाधिकारी एल. के. कुरूडे, शाखा अभियंता सय्यद सलीम यांच्यासह कंत्राटी कर्मचारी सहाय्यक कार्यक्रम अधिकारी गजानन कल्याणकर, तांत्रिक अधिकारी राहुल सूर्यवंशी, तांत्रिक अधिकारी सुयोग जावळे, डेटा एंट्री ऑपरेटर देवराव कंठाळे, विनोद गायकवाड आणि विनोद घोडके हे नऊ जण दोषी आढळले होते. जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे आज दुपारी औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात या नऊ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या सर्व आरोपींचा पोलीस तपास करत आहेत.
