नागपूरच्या विभागीय आयुक्त डॉ. माधवी खोडे-चवरे व त्यांचे पती डॉ. सुरेश चवरे यांनी एका अनाथ मुलीचे पालकत्व स्वीकारून तिचे स्वत:च्या मुलीप्रमाणे पालनपोषण केले. १० जूनला तिचा विवाह समारंभ पार पडला. त्यावेळी चवरे दाम्पत्य गहिवरले होते. चंद्रपूरच्या मूल येथे शेतमजुरी करणारे बाबुराव नन्नावरे हे पत्नी निर्मला व मुलगी नम्रताला घेऊन कामाच्या शोधात कुही येथे आले. नम्रता दहा वर्षांची असताना बाबुराव नन्नावरे यांचे निधन झाले. आई निर्मलाने नम्रताचे शिक्षण सुरू ठेवले. ती बी.ए.च्या प्रथम वर्षाला असताना तिच्या आईचे निधन झाले.
नम्रता शासकीय वसतिगृहात शिक्षण घेऊ लागली. दरम्यान, २०१७ मध्ये डॉ. माधवी खोडे-चवरे (सध्या त्या नागपूरच्या विभागीय आयुक्त आहेत.) यांनी वसतिगृहाला भेट दिली तेव्हा नम्रताची कहाणी त्यांना कळली. डॉ. माधवी खोडे व त्यांचे पती डॉ. सुरेश चवरे यांनी नम्रताचा मानसकन्या म्हणून स्वीकार करण्याचे ठरवले. आपल्या दोन मुलांप्रमाणे नम्रताकडेही त्यांनी तितकेच लक्ष दिले. दरम्यान, नम्रताने एम.ए. केले. तिच्यासाठी योग्य जोडीदाराचा शोध सुरू झाला. तारसा निमखेडा येथे युवक रोशन मेश्राम याच्या रूपात जोडीदार मिळाला. नम्रता व रोशनचे १० जूनला विवाह समारंभ पार पडला. घरची मुलगी सासरी जात असताना आई-वडिलांच्या डोळ्यात पाणी येते. हीच अवस्था मानसकन्या नम्रता सासरी जाताना चवरे दाम्पत्याची झाली होती.

