अक्कलकुवा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या मांडवा केंद्रात ४ शाळांना मंजुरी देण्यात आल्यानंतर शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. सिपानपाडा येथे रोहिदास सरदार पावरा, दुडापाडा येथे कांतीलाल अग्रेशा पावरा, पिपलापाडा येथे परमानंद सारख्या कोकणी, उंबरपाड येथे अमोल मनोहर ठीगले यांची तात्पुरत्या स्वरूपात प्रतिनियुक्तीवर नियुक्ती करण्यात आली असून यांना दुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय झाली आहे.
जि.प.सदस्याचा पाठपुरावा
जिल्हा परिषद भांग्रापाणी गटाच्या सदस्या बाजूबाई किरसिंग वसावे यांनी सर्वसाधारण सभेत नर्मदा काठावरील दुर्गम भागात शाळा सुरू करण्याच्या प्रश्न वेळोवेळी उपस्थित करून अध्यक्षा ॲड. सीमा वळवी, उपाध्यक्ष ॲड. राम रघुवंशी व शिक्षण सभापती अजित नाईक यांना निवेदन दिली. माजी सदस्य किरसिंग वसावे यांनी देखील पदाधिकारी व अधिकाऱ्यांशी वेळोवेळी भेटीगाठी घेत समस्या मांडल्या. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शिक्षणाच्या लाभ देण्यात येईल. कोणीही शिक्षणापासून वंचित राहणार नाही. अतिदुर्गम भागातील नर्मदा काठावरील मुलांसाठी शैक्षणिक सुविधा निर्माण करून देण्याचे आश्वासन देत उपाध्यक्ष ॲड. राम रघुवंशी यांनी सतत पाठपुरावा केला. त्यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आले. शिक्षण विभागाने नुकतीच ४ शाळांना प्रशासकीय मान्यता दिली.
