सासू-सुनेतील किरकोळ कारणावरुन सुरू झालेला वाद विकोपाला गेला आणि १८ वर्षीय सुनेने सासूची हत्या केली. ही घटना शिंदखेडा तालुक्यातील बेटावद शिवारात घडली आहे. सियादीबाई लाला बारेला (वय ४५), असे हत्या करण्यात आलेल्या सासूचे नाव आहे. तर भुरीबाई गणे बारेला असे आरोपी सुनेचे नाव आहे. याप्रकरणी नरडाणा पोलीस ठाण्यात सुनेविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गणेश बारेला हा शिरपूर तालुक्यातील वरझडी, पारशीपाडा येथील रहिवासी आहे. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून तो बेटावद येथील यशवंत निंबा महाजन यांच्या शेतात सालदार म्हणून वास्तव्याला आहे. त्याच्यासोबत त्याची पत्नी भुरीबाई बारेला आणि आई सियादीबाई बारेला राहत होत्या. काल सायंकाळच्या सुमारास दोघांमध्ये किरकोरळ कारणावरुन भांडण झाले. मात्र, हे भांडण विकोपाला गेले.
रागाच्या भरात भुराबाईने तिची सासू सियादाबाई यांच्या डोक्यात मागून लाकडी दांड्याने जोरदार वार केला. त्यानंतर जवळच असलेल्या एका लिंबाच्या झाडाखाली नेले आणि त्याठिकाणी दगडाने ठेचले. या घटनेत सियादीबाई रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे माहित झाल्यावर लगेच त्यांच्या मुलाने घटनास्थळी धाव घेतली. तसेच, शेतीमालकालाही याबाबत माहिती दिली. यानंतर सुरुवातीला सियादीबाई यांना बेटावद येथील प्राथमिक आरोग्य केंद्र बेटावद येथे दाखल केले. मात्र, तिथून त्यांना पुढे धुळे येथे घेऊन जाण्यास सांगितले. धुळे येथे घेऊन जात असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
