तक्रारदाराच्या भोणे (ता.नंदूरबार) शिवारात शेत असून शेतात वीज कनेक्शन घ्यावयाचे असल्याने तकारदार यांनी एमएसईबी कार्यालय, नंदुरबार येथे ऑक्टोबर २०२१ मध्ये डिमांड नोट मिळणेकरीता ऑनलाईन अर्ज केला होता. त्यानंतर तक्रारदार यांनी वारंवार एमएसईबी कार्यालयाशी संपर्क साधला असता वायरमन अनिल मांगडू भोये यांनी खाजगी वायरमन देवा मराठे यांच्या मार्फत ३० हजार लाचेची मागणी केली. तडजोडीअंती २७ हजार ५०० रुपये त्यात १५ हजार रुपये डिमांड नोट व १२ हजार ५०० रुपये लाचेची मागणी केली.
दोघे ताब्यात
दरम्यान तक्रारदार यांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला कळविले. खाजगी वायरमन देवा मराठे यांनी २७ हजार ५०० रुपये पंच साक्षीदारांसमोर स्वीकारले. याप्रकरणी खाजगी वायरमन देवानंद ऊर्फ देवा पंडित मराठे, व म.रा.वि.वि. कंपनीचे वायरमन अनिल मांगडु भोये यांना ताब्यात घेण्यात आले. सदर कामगिरी पोलीस उपअधीक्षक राकेश चौधरी, पोलिस निरीक्षक समाधान वाघ, पोलीस निरीक्षक माधवी एस. वाघ, पोहवा विजय ठाकरे, पोना/अमोल मराठे, पोना देवराम गावीत, अँन्टी करप्शन ब्युरो नंदुरबार पथकाने केली आहे.
