अकोला: अकोला जिल्हा परिषदेच्या हातरुण गटात 'वंचित बहुजन आघाडी'ने शिवसेनेला धक्का दिला आहे. हातरूण गटासाठी झालेल्या पोटनिवडणुकीत वंचितनं विजय मिळवला आहे. हातरुण गटाच्या पोटनिवडणुकीसाठी काल, रविवारी मतदान झाले. पोटनिवडणुकीचा आज, सोमवारी निकाल जाहीर करण्यात आला.
वंचित बहुजन आघाडीच्या लीना शेगोकार या ४३०१ मते मिळवून विजयी झाल्या. तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या अश्विनी गवई यांना २६६० मते मिळाली आहेत. या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेस स्वबळावर लढला होता.
जिल्हा परिषदेच्या बाळापूर तालुक्यातील हातरूण गटातून (Hatrun) निवडून आलेल्या शिवसेनेच्या सदस्या सुनीता गोरे यांना विभागीय आयुक्तांनी अपात्र घोषित केल्यामुळे या गटासाठी पोटनिवडणूक झाली. पोटनिवडणुकीत कॉंग्रेस, शिवसेना, भाजप व वंचितच्या उमेदवारांमध्येच थेट लढत पाहायला मिळाली. तर एक अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या मैदानात होता.
या निवडणुकीवर जिल्हा परिषदेमधील सत्तासमीकरण अवलंबून असल्याने ही निवडणूक सत्ताधारी वंचित व विरोधातील इतर पक्षांसाठी अतिशय महत्वाची मानली जात होती. दरम्यान आजच्या निकालानंतर वंचितच्या लीना शेगोकार यांना ४३०१ मते मिळाली. शिवसेनेच्या अश्विनी गवई यांना २६६० मते, भाजपच्या राधिका पाटेकर यांना २०९१ मते, काँग्रेसच्या रशिका इंगळे यांना ३६२ मते मिळाली. या निवडणुकीत वंचितच्या शेगोकार या १६४१ मताधिक्याने विजयी झाल्या.
तर वंचित बहुजन आघाडी सत्ता राखणार?
अकोला (Akola) जिल्हा परिषदेचा अडीच वर्षांचा कार्यकाळ संपत आल्याने जुलै महिन्यात जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापतींच्या निवडणुका होणार आहेत. ५३ सदस्य संख्या असलेल्या जिल्हा परिषदेमध्ये सत्ता काबीज करण्यासाठी २७ सदस्यांची गरज भासणार आहे. वंचितची आजच्या विजयानंतर २५ सदस्य संख्या झाली आहे. मात्र तरीही वंचित बहुजन आघाडीला आणखी दोन सदस्यांची गरज लागणार आहे. दरम्यान गेल्या निवडणुकीत भाजपने निवडणुकीतून माघार घेतल्याने वंचितने सत्ता काबीज केली होती. दरम्यान, जुलै महिन्यात होणाऱ्या निवडणुकीत जिल्हा परिषदेवर कोणाचा झेंडा फडकणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
पोटनिवडणुकीनंतर जिल्हा परिषदेतील पक्षीय बलाबल
वंचित बहुजन आघाडी (अपक्षासह): २५
शिवसेना : १२
भाजप : ०५
काँग्रेस : ०४
राष्ट्रवादी : ०४
प्रहार : ०१
अपक्ष : ०२
महाविकास आघाडी (२३)
