अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी, जळगावात तरुणाकडून खंडणी वसुली

फुले शाहू आंबेडकर
0
जळगाव : तरुणाचा अश्लील व्हिडिओ तयार करुन तो व्हायरल करण्याची धमकी, तसेच खूनाचा व्हिडिओ व्हॉट्सॲपवर पाठवून तशाच प्रकारे खून करण्याची धमकी दिल्याची घटना उघडकीस आली आहे. ऑनलाईन पद्धतीने खंडणी उकळल्याचा प्रकार जळगाव जिल्ह्यात एरंडोल तालुक्यातील एका गावात समोर आला आहे. संबंधितांचा त्रास असह्य झाल्याने तरुणाने गुरुवारी सायबर पोलिसात तक्रार दिली असून त्यावरुन गुन्हा दाखल झाला आहे.
या संदर्भात ३१ वर्षीय तरुणाने दिलेल्या तक्रारीनुसार, फेब्रु- २०२१ ते ८ जून २०२२ या कालावधीत त्याच्याशी व्हॉट्सअॅप मेसेजद्वारे चॅटिंग करण्यात आले. पीडित तरुणाच्या काम भावना उत्तेजीत केल्या गेल्या. तसेच खून झालेल्या आणि रक्तबंबाळ अवस्थेत असलेल्या व्यक्तीचा व्हिडिओ व्हॉट्सअॅपद्वारे पाठवून तरुणाचा अशाच प्रकारे मृत्यू घडवून आणू, अशी धमकी दिली.
तसेच पीडित तरुणाचे अर्धनग्न अवस्थेतील व्हिडिओ निवडणुकी मधील विरोधी पार्टीला पाठवून व्हायरल करण्याची धमकी देखील दिली. यानंतर पीडित तरुणाकडून 'फोन पे'वरून ४ एप्रिल २०२२ रोजी १५ हजार रुपये, दि. ७ जून २०२२ रोजी २ हजार रुपये असे एकूण १७ हजार रुपये ऑनलाईन स्वीकारले. तसेच वारंवार पैशांची मागणी केली. अशा तक्रारीवरुन संबंधित व्हॉट्सअॅप मोबाईल वापरणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो. नि. लीलाधर कानडे हे करीत आहेत.
दुसरीकडे, विवाहितेचे अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल करुन कथित प्रियकराने तिची बदनामी केल्याचा धक्कादायक प्रकार औरंगाबाद जिल्ह्यात समोर आला होता. प्रियकराने केलेल्या बदनामीमुळे पीडित विवाहितेचे मानसिक संतुलन बिघडले. त्यामुळे तिच्यावर जवळपास तीन महिने जालना येथील एका खासगी रुग्णालयात उपचार करावे लागले. पीडित महिलेने पोलिस तक्रारीत हा दावा केला आहे. त्यानुसार आरोपी तरुणाच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default