औरंगाबाद : तीन वर्षांपूर्वी थाटामाटात लग्न झाले, परंतु तीन वर्ष संसार चालल्यावरही 'तु चांगली दिसत नाही, तुला काम येत नाही.' असं म्हणत सासूने सुनेला नांदवायला नकार दिल्याचा धक्कादायक प्रकार औरंगाबादेत उघडकीस आला आहे.
याप्रकरणी औरंगाबादच्या सिडको पोलिस ठाण्यात पिडीत सुनेने दिलेल्या फिर्यादीनुसार पतीसह सासू सासऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुधीर रघुनाथ काळे असे पतीचे तर वारूबाई रवळे, गोरखनाथ रवळे असे सासु सासऱ्यांची नावे आहेत.
लग्नाच्या सहा महिन्यांनंतर दिसण्यावरुन, कामावरून टोमणे मारत, तसेच लग्नात आईवडीलांनी हुंडा, दागिने दिले नाही असे म्हणत सासू त्रास देत असल्याचे पिडित सुनेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. तसेच सासरी भरपूर शेती असल्याने तिच्याकडून मजुरांसोबत त्यांच्यासारखे काम करून घेतात व मजुरांसमोर तिला वाईट वागणूक दिली जात असल्याचे पिडितेने आरोप केला आहे.
दरम्यान, पती देखील आई-वडिलांच्या एकूण शिवीगाळ करत मारहाण करायचा तसंच दरम्यानच्या काळात दोन्हीकडील मंडळींनी अनेक वेळा मध्यस्थी करत वाद मिटवले होते. परंतु तिला नांदवण्यात येत नसल्याने पिढीतेने अखेर पोलिसात धाव घेतली. या प्रकरणी सिडको पोलीस अधिक तपास करत आहेत.
