रावेर पंचायत समितीत झालेल्या टॉयलेट घोटाळ्यातंर्गत तीन महिन्यांपुर्वी गुन्हा दाखल होता. परंतु, या घोटाळ्यातील आरोपी आतापर्यंत फरार होते. मात्र बुधवारी (६ जून) सायंकाळी उशिरा पोलिसांनी पंचायत समितीचे अकाउंटंट लक्ष्मण दयाराम पाटील, रवींद्र रामू रायपुरे व नजीर हबीब तडवी (रा. पाडळा बुद्रूक) व बाबूराव संपत पाटील (रा. विवरा बु.) या चौघांना अटक केली आहे. मुख्य आरोपी मात्र अद्याप फरार आहे. पोलिस निरीक्षक कैलास नागरे, उपनिरीक्षक शीतलकुमार नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली सुनील वंजारी, विकारुद्दीन शेख, अमोल जाधव, सुकेश तडवी, सचिन घुगे, सुरेश मेढे आणि समाधान ठाकूर यांच्या पथकाने अटक केली.
चौघेही अपहाराचे लाभार्थी
अटक झालेले चौघेजण या घोटाळ्यातील अपहाराचे लाभार्थी आहेत. या चौघांच्या बँक खात्यात दोन किंवा त्यापेक्षा जास्त वेळा अनुदानाची रक्कम वर्ग झाल्याचे आढळून आल्याने ही कारवाई केली असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यापासून तब्बल अडीच महिन्यानंतर ही पहिली कारवाई पोलिसांनी केली आहे. दोन किंवा त्यापेक्षा जास्त वेळा अनुदानाचा बेकायदेशीर लाभ घेतलेले सुमारे १२६ जण पोलिसांच्या कारवाईच्या टप्प्यात आहेत.
