शेख रहीम शेख अजीज (वय 21) असे धुलाई करून अटक केलेल्या रोड रोमिओचे नाव आहे. आरोपी रहीम हा उस्मानपुरा परिसरातील देवानगरीत राहतो. गेल्या काही दिवसांपासून तो रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना बघून अश्लील चाळे करायचा. मंगळवारी देखील आरोपीने एका तरुणीकडे पाहून अश्लील चाळे केले.
मात्र भितीपोटी कुणीही त्याची तक्रार द्यायला समोर येत नव्हतं. दरम्यान, याबाबतची माहिती उस्मानपुरा पोलिसांना मिळाली. यानंतर असा प्रकार घडला तर थेट आम्हाला कॉल करा असे पोलीस निरीक्षक गीता बागवडे यांनी परिसरातील नागरिकांना तसेच महिलांना सांगितले होते.
दरम्यान, मंगळवारी, पुन्हा आरोपी तरुण रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या महिलांची छेड काढत होता. याबाबतची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक बागवडे यांनी पथकासह घटनास्थळ गाठलं. त्यावेळ तिथे उपस्थित असलेल्या आरोपी शेख रहिमची त्यांनी खात्री केली. आणि घटनास्थळी महिलांसमोरच त्याची चांगलीच धुलाई केली.
त्यानंतर त्याला पोलीस ठाण्यात आणून त्याच्याविरुद्ध महिलाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी विकृत मनोवृत्तीचा असून त्याने याआधी देखील महिला तरुणी दिसल्यानंतर अश्लील चाळे केले होते. अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.
