सातारा : साताऱ्यातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. जादूटोणा आणि काळ्या जादूच्या हेतूनं आजीनेच नातीची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. २०१९ च्या जानेवारी महिन्यातील पाटण तालुक्यातील ढेबेवाडी पोलीस स्टेशन हद्दीतील धक्कादायक घटना पोलिसांनी उघड केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी मुलीच्या आजीसह तिघांना अटक केली आहे. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साताऱ्याीतल करपेवाडी गावाच्या हद्दीतील देसाई शेत नावाच्या ऊसाच्या शिवारात अज्ञात व्यक्तीने धारधार हत्याराने भाग्यश्री संतोष माने या १७ वर्षीय मुलीचा गळा कापून हत्या केली होती. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावरील परिस्थितीजन्य पुराव्यावरून मुलीची हत्या ही नरबळीकरिता करण्यात आल्याचे निष्पन्न झाले होते.
सदर घटनेनंतर अजय कुमार बंसल पोलीस अधीक्षक, सातारा व अजित बोहाडे अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवून सदरचा प्रकार हा नरबळीचा असल्याने सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना विवेक लावंड, उपविभागीय पोलीस अधिकारी पाटण विभाग पाटण व किशोर धुमाळ पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, सातारा व संतोष पवार सहायक पोलीस निरीक्षक ढेबेवाडी पोलीस ठाणे यांना दिल्या. त्याप्रमाणे गुन्हा उघडकीस आणण्याकरीता स्थानिक गुन्हे शाखा सातारा, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय पाटण व ढेबेवाडी पोलीस ठाणेकडील पथके अथक प्रयत्न करत होते.
दरम्यान, सदर तपास सुरू असताना तपास पथकास दोन संशयित व्यक्ती गुन्हाच्या घटनेच्यावेळी त्या परिसरामध्ये असल्याबाबत माहिती प्राप्त झाली. तपास पथकाने त्यांच्या हालचालीवर बारकाईने लक्ष दिले असता तपास पथकास सदर व्यक्ती हे एका मांत्रिकाच्या संपर्कात असल्याचे आढळून आले. सदर मांत्रिक गुन्ह्याच्या घटनेच्या वेळी परिसरात असल्याचे निष्पन्न झाले.
त्यादृष्टीने त्या दोन व्यक्तींचा तपास पथकांनी सखोल व बारकाईने विचारपूस केली असता त्यांनी गुप्तधनाच्या अमिषापोटी मांत्रिकाच्या सांगण्यावरून मृत मुलीच्या आजी आणि दोन संशयितांपैकी एक व्यक्ती व आणखी एका महिलेने यांनी कट रचून संगनमताने मुलीस गुंगीचे औषध देवून तिला उसाच्या शेतात नेऊन तिचा गळा चिरून बळी दिला. सदर बळी हा गुप्त धनाच्या आमिषातून मुलीची हत्या झाल्याचे उघड झाले आहे. या घटनेतील आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.