नंदुरबार येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील सर्व अभिलेख संबंधित लिपिक श्री. बागूल यांनी तपासले असता कोणीतरी बनावट आरसी बुक बनविल्याचे तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालयातील शिल्लक असलेले निवडक / आकर्षक क्रमांकाचा वापर करीत असल्याचे निदर्शनास आले. तसेच हस्तलिखित अभिलेखावर नोंदी नसलेले ८३ निवडक/आकर्षक वाहन क्रमांकाबाबत धक्कादायक माहिती समोर आली. सदर वाहन पोर्टलवरील बॅकलॉग साइटवर पाहणी केली असता ते वाहन क्रमांक रजिस्ट्रेशन असल्याचे दिसून आले. त्यामुळे लिपिक श्री. बागूल यांनी तत्काळ सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी उत्तम जाधव, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बीडकर यांना माहिती दिली. श्री. बीडकर यांनी पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांची भेट घेत माहिती दिली.
नंदुरबार जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तत्काळ स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना चौकशी करण्याच्या सूचना दिल्या. श्री. कळमकर यांनी चौकशी केली असता हस्तलिखित अभिलेखावर नोंदी नसलेले ८३ निवडक/आकर्षक वाहन क्रमांक हे इतर वाहनांना वापरून तसेच शासनाला कोणताही टॅक्स न भरता ते वाहन रजिस्टर केल्याचे दाखविले. तसेच विविध कंपनीच्या विविध मॉडेलच्या ८३ वाहनांच्या इंजिन नंबर किंवा चेसिस नंबरमध्ये खाडाखोड करुन शिवाय बनावट आरसी बुक तयार करुन शासनाची अंदाजित ६६ लाख ५९ हजार ९०० रुपयाची फसवणूक केली. ८३ वाहन धारक, एजंट, तसेच इतर संबंधित व्यक्तींविरुद्ध नंदुरबार शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्यात सहभाग असणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल ,असा विश्वास जिल्हा पोलिस अधिक्षक पी.आर.पाटील यांनी व्यक्त केला.
