स्वातंत्र्यदिनी महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न

फुले शाहू आंबेडकर
0

 जळगाव : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त प्रशासकीय ध्वजारोहण सोहळा सुरू असताना, एका महिलेने आत्मदहनाचा प्रयत्न केला. नेरी (ता. जामनेर) येथील रहिवासी वंदना सुनील गुजर-पाटील असे या महिलेचे नाव असून, त्यांच्या व्यापारी नवऱ्याची जामनेर येथील धनदांडग्यांनी आर्थिक लूबाडणूक करूनही त्यांच्यावर कारवाई होत नसल्याने त्यांनी आत्मदहन करण्याचा टोकाचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले. मात्र, पोलिसांनी प्रसंगावधान राखल्याने अनर्थ टळला

सोमवारी (ता. १५) जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्या आवारात शासकीय ध्वजारोहण झाल्यानंतर पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे भाषण सुरू असताना, मागील बाजूला एका महिलेने आत्मदहनचा प्रयत्न केला. या महिलेने अंगावर रॉकेल ओतून स्वत:ला पेटविण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी सतर्कता दाखविल्यामुळे अनर्थ टळला. या महिलेस पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र, अचानक झालेल्या या प्रकारामुळे प्रचंड खळबळ उडाली.

आत्मदहनाचा प्रयत्न करणारी महिला नेरी (ता. जामनेर) येथील व्यापारी सुनील गुजर यांची पत्नी वंदना आहे. सुनील गुजर यांनी जामनेरातील काही व्यापाऱ्यांनी आपली फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. याबाबत अनेकदा त्यांनी लेखी तक्रारी करूनही संबंधितांवर कोणतीच कारवाई होत नाही. त्यांच्या फसवणूक प्रकरणाबाबत त्यांनी काही दिवसांपूर्वीच जळगावात पत्रकार परिषद घेऊन आणि नंतर उपोषण करून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. ज्यांच्यावर त्यांनी आरेाप-प्रत्यारेाप केले आहेत, ते प्रचंड मोठी आसामी असून, राजकीयदृष्ट्या सक्षम असल्याने प्रशानातर्फे त्यांच्यावर कुठलीच कारवाई होत नसल्याचा आरोप वंदना सुनील गुजर-पाटील यांनी या आधीच केला होता. मात्र, प्रशासनही दखल घेत नसल्याने चक्क स्वातंत्र्य दिनालाच थेट शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम सुरू असताना, त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला.

नव्याने चौकशीचे आदेश : पाटील

शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर पत्रकारांनी मंत्री गुलाबराव पाटील यांना यासंदर्भात प्रश्‍न विचारला असता, ते म्हणाले, की सुनील गुजर या व्यापाऱ्याच्या प्रकरणाबाबत आपल्याला पूर्ण माहिती असून, त्याची आधीच पूर्ण चौकशी झाली आहे. आता या प्रकरणाची नव्याने चौकशी करण्याच्या सूचना आपण संबधितांना दिल्या आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default