धुळे : धुळे महापालिकेकडून हद्दवाढ केलेल्या परिसरात सुविधा न देता कर वसुली केली जात आहे. या पठाणी वसुली विरोधात शिवसेनेच्या वतीने नोटीसा जाळून पालिकेच्या प्रवेशद्वारावर असलेल्या पायऱ्यांवर बसून निषेध आंदोलन करण्यात आले आहे
धुळे महानगरपालिका हद्दीमध्ये वलवाडी गावासह जवळपास 11 गावांचा नव्याने हद्दवाढी दरम्यान समावेश करण्यात आला आहे. परंतु 2022 पर्यंत या सर्व हद्दवाढीमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या गावांना कुठल्याही प्रकारची सुविधा पालिका प्रशासनातर्फे पुरवली जात नाही. तरी देखील अव्वाच्या सव्वा करवाढ मालमत्ता धारकांवर लादण्यात आली असल्याचा आरोप या नागरिकांनी केला असून या नागरिकांना पालिका प्रशासनातर्फे नोटीस देखील बजावण्यात आले आहे.
नोटीसांची होळी
पालिका प्रशासनाच्या पठाणी वसुली विरोधात या नागरिकांनी शिवसेनेच्या वतीने धुळे महानगरपालिका प्रवेशद्वारावर पायऱ्यांवर बसून पालिका प्रशासनाचा निषेध करण्यात आले. यावेळी पालिका प्रशासनातर्फे बजावण्यात आलेल्या नोटिसांची होळी करून शिवसेनेच्या वतीने पालिका प्रशासना विरोधात घोषणाबाजी करीत निषेध करण्यात आला आहे.

