या पावसाळय़ात मागील महिन्यापासून तालुक्याच्या पश्चिम भागात जोरदार पाऊस सुरू आहे .त्यामुळे परिसरातील सर्व नद्या, नाले दुथडी भरून वाहत आहेत. असे असतानाही पाल्याच्या शिक्षणात खंड पडू नये, यासाठी पालक दररोज आपल्या पाल्याला कडेवर किंवा खांद्यावर घेऊन नदी पार करतात. अनेक दिवसांपासून या विद्यार्थ्यांना अशा प्रकारे नदीपात्र पार करावे लागत आहे.
अनेकदा पालक आणि नागरिकांनी शासनाकडे आपली कैफियत मांडली आहे, परंतु या नदीपात्रावर शासनाने पूल उभारलेला नाही. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. एकीकडे शिक्षणाच्या मूलभूत अधिकारांतर्गत ग्रामीण भागातील सर्व स्तरांतील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे यासाठी शासन प्रयत्नशील असताना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घालावा लागत आहे .त्यामुळे शासनाने तातडीने या नदीवर पूल बांधून येथील विद्यार्थ्यांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी जोरण येथील विद्यार्थी आणि पालकांनी केली आहे.
जोरण येथील ४०ते ५० विद्यार्थी रोज शाळेसाठी इतरत्र जात असतात. पावसाळय़ात या विद्यार्थ्यांना जोरण ते जुना नळवाडी रस्त्यावरील नदी ओलांडून जावे लागते. पाऊस सुरू असताना नदीच्या पाणी पातळीत वाढ होते. अशावेळी जीव धोक्यात घालून शालेय विद्यार्थ्यांना पात्र ओलांडावे लागते. या ठिकाणी पूल बांधून मिळावा यासाठी आतापर्यंत अनेक वेळा शासनाकडे पाठपुरावा करण्यात आला आहे, परंतु अजून ते झाले नाही. त्यामुळे जीवघेणी कसरत सुरूच आहे
