धुळे : राज्य उत्पादन शुल्क धुळे विभागाच्या आणि नाशिक विभागाच्या भरारी पथकाने धुळ्यात मोठी कारवाई करत मद्य तस्करांना मोठा दणका दिला आहे. मुंबई - आग्रा महामार्गावरील आर्वी शिवारात सापळा रचत आयशर गाडीतून वाहतूक होणारा परराज्यातील विदेशी मद्यसाठा पकडला आहे. राज्य उत्पादन शुल्क धुळे विभागाने आयशर गाडीसह सुमारे सव्वा कोटीचा विदेशी मद्यसाठा असा एकूण दीड कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करत चालकासह दोघांना ताब्यात घेतले आहे.
वाहनाची तपासणी केली असता त्यात विदेशी मद्याचा साठा मिळून आला. यामध्ये १ कोटी २३ लाख ३७ हजार ९२० रूपये किंमतीचा विदेशी मद्यसाठा आणि २२ लाखांचा ट्रक असा एकूण १ कोटी ४५ लाख ३८ हजार ४२० रूपये किंमतीचा मुद्येमाल जप्त करण्यात आला. तसेच केरळ व कर्नाटक येथील वाहन चालक शालू. एके रामनकुट्टी (वय ४२, रा. आसरखंडी, केदावुर, पो.तामरचेरी, जि.कोझीकोड केरळ) व क्लीनर शिवानंद शंकर कट्टीकार (वय ३२ रा. बेन चिनमर्डी जि.बेलगम, कर्नाटक) यांना ताब्यात घेतले आहे.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप, राज्याचे संचालक सुनिल चव्हाण, विभागीय उप आयुक्त अर्जुन ओहोळ तसेच धुळे विभागाचे अधीक्षक मनोज शेवरे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय भरारी पथकाचे निरीक्षक ए. एस. चव्हाण, दुय्यम निरीक्षक व्ही. एम. पाटील, जवान गोकुळ शिंदे, विठ्ठल हाके, लोकेश गायकवाड, युवराज रतवेकर, भाऊसाहेब घुले यांनी केली.

