तालुक्यातील नशिराबाद गावाजवळील कडगाव फाट्याजवळ भादली येथील संदेश लिलाधर आढाळे (वय-२२) रा. डोंगरकठोरा. ता.यावल ह.मु. भादली ता.जि.जळगाव या तरूणाचा मृतदेह संशयास्पदरित्या आढळून आल्याची घटना आज सकाळी उघडकीला आली आहे.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. नशिराबाद पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पंचनामा करण्यात आला.
संदेश लिलाधर आढाळे हा तरूण आई वडीलांसह वास्तव्याला आहे. जळगावात एका खासगी फायनान्स कंपनीत कामाला होता. संदेशचे वडील खासगी वाहन चालक असून ते नाशिक येथे राहतात.
दरम्यान, बुधवार १० ऑगस्ट रोजी सकाळी संदेशचा मृतदेह नशिराबाद पोलीस हद्दीतील कडगाव रस्त्यावरील पाटचारीजवळील शेतात आढळून आला आहे. या घटेची माहिती मिळाल्यानंतर ही वार्ता वाऱ्यासारखी पसरली. नशिराबाद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे, एएसआय अलियार खान, समाधान पाटील, किरण बाविस्कर, संजय जाधव, बाळू पाटील या पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेवून संदेश आढाळे याचा मृतदेह आल्याचे आढळून आले. त्याच्या पोटावर आणि डोक्यावर घाव असल्याने त्याचा खून करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
याबाबत नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्याचे काम सुरू होते. मयताच्या पश्चात वडील लिलाधर राघो आढाळे, आई छाया आणि विवाहित बहिण असा परिवार आहे.
