रुग्णालय आहे, मात्र डॉक्टर नाही; नाशिक शहरातील विदारक परिस्थिती

फुले शाहू आंबेडकर
0

नाशिक - रुग्णालय आहे, मात्र डॉक्टर आणि स्टाफ नाही. हे धक्कादायक वास्तव राज्यातल्या कुठल्या ग्रामीण भागातील नाही. तर स्मार्ट सिटीचा टेंभा मिरवणाऱ्या नाशिक शहरातील ही विदारक परिस्थिती आहे. नाशिकच्या मुलतान पुरा या मध्यवर्ती भागातील नाशिक महापालिकेच्या प्रसूतिगृहाची नवी कोरी इमारत बांधून तयार आहे.

खासगी रुग्णालयाच्या  तुलनेत उच्च दर्जाची प्रसूतिसाठी लागणारी अद्ययावत यंत्रसामुग्री आणि साहित्य सर्व काही या ठिकाणी बसवण्यात आलं आहे. महिलांसाठी तयार करण्यात आलेल्या या प्रसूतिगृहाचं उद्घाटन मोठा गाजावाजा करत तत्कालीन पालकमंत्री छगन भुजबळ  यांच्या हस्ते करण्यात आलं.

प्रसूतिगृहाचं उद्घाटन होऊन आता एक वर्ष उलटलं मात्र डॉक्टर आणि स्टाफच नसल्यानं वर्षभरानंतरही प्रसूतिगृह काही सुरू होऊ शकलं नाही. त्यामुळे या प्रसूतिगृहातील लाखोंची यंत्रणा वापराअभावी धूळ खात पडून आहे. जुन्या नाशिकमध्ये महिलांसाठी स्वतंत्र प्रसूतिगृह नसल्यानं गर्भवती महीलांना मोठा त्रास सहन करावा लागायचा. त्यामुळे मुलतानपुरा भागात महिलांसाठी हे लाखो रुपये खर्चून विशेष प्रसूतिगृह बांधण्यात आलं.

मागील वर्षी १५ ऑगस्टला या प्रसूतिगृहाच उद्घाटन झाल्यानंतर महिलांना या ठिकाणी चांगल्या सुविधा मिळतील, अशी अपेक्षा होती. मात्र उद्घटनानंतरही या प्रसूतिगृहाला अद्यापही टाळ लागलेलं असल्यानं महिलांना अद्यापही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो आहे. तर महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात कोरोना रुग्णांमुळे प्रसूति विभाग बंद असल्याने गर्भवती महिलांना शहरातील अन्य रुग्णालयात नेण्यासाठी नातेवाईकांना धावपळ करावी लागते. अनेकदा रुग्णालयात जागा नसल्यानं महिलांची हेळसांड होत आहे.

केवळ महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे या ठिकाणी सेवा देण्यासाठी पुरेसे डॉक्टर आणि अन्य स्टाफ नसल्यानं प्रसूतिगृह बंद ठेवण्याची वेळ आली आहे. त्यामुळे लाखो रुपये खर्चून बांधण्यात आलेली इमारत आणि सर्व अद्ययावत यंत्रसामुग्री धूळ खात पडून असल्यानं खराब होण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे असून अडचण नसून खोळंबा अशी या प्रसूतिगृहाची अवस्था झाली आहे.

धक्कादायक बाब म्हणजे नाशिकसारख्या मेट्रो सिटीत जर आरोग्य व्यवस्थेची ही परिस्थिती असेल, तर ग्रामीण भागात किती वाईट अवस्था असेल, हे यावरून स्पष्ट होत. आरोग्य विभागावर दरवर्षी कोट्यावधींचा खर्च होऊनही ही परिस्थिती असेल, तर राज्याची आरोग्य यंत्रणाच किती आजारी आहे, हे वेगळं सांगायला नको.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default