काय आहे प्रकरण?
याबाबत अधिक माहिती अशी, मलवडी येथील बस स्थानक परिसरात मलवडी येथे श्रीकांत कदम यांचे जय भवानी ज्वेलर्स नावाचे सोने-चांदीचे दुकान आहे. दिवसभर व्यवसाय केल्यानंतर दुकानातील सर्व ऐवज त्यांनी तीन पिशव्यांमध्ये भरला. त्यात ४० तोळे सोने, साधारण ५० किलो चांदी व रोख 7 लाख रुपये असा ऐवज होता. या पिशव्या घेऊन ते आपल्या दुचाकीवरून पुतण्या श्रीजित शिवाजी कदम याच्यासोबत घरी निघाले होते.
मलवडीच्या प्राथमिक आरोग्य केंद्र जवळून जात असताना अचानक एक जण समोर आला असता. संशय आल्यामुळे त्यांनी गाडी पळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तेवढ्यात अजून तिघे जण धावत आले. त्यांनी श्रीजितला जोरात मारले . त्यामुळे श्रीकांत यांचा गाडीवरील ताबा सुटून गाडी खाली पडली. गाडीवरून खाली पडलेल्या तीन पिशव्या दोघांनी उचलल्या व तिघे त्यांच्या दुचाकीकडे पळाले, तर एकाने तलवारीने श्रीजित याच्या हातावर, तर नंतर श्रीकांत यांच्या खांद्यावर वार केला. अशा अवस्थेतही या दोघा चुलत्या पुतण्यांनी मिळून या संशयिताला पकडून ठेवून जोरजोरात ओरडण्यास सुरुवात केली.
आपला साथीदार परत आलेला नाही, हे लक्षात येताच एक जण दुचाकीवरून परत आला व त्याने पिस्टल मधून दोन वेळा गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी चुकवताना श्रीकांत यांनी पकडून ठेवलेल्या संशयितास पुढे केल्याने त्याच्या पाठीला चाटून गोळी गेली. ही झटापट सुरू असतानाच ग्रामस्थ जमा होऊ लागल्याने तीन दरोडेखोरा पळून गेले. या घटनेची माहिती दहिवडी पोलिस ठाण्यात दिल्यानंतर तत्काळ सहायक पोलिस निरीक्षक अक्षय सोनवणे व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पकडलेल्या चोरावर प्राथमिक उपचार करून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
