सेंधव्याजवळ 50 लाखांचे सागवान जप्त; विनापरवाना सुरू होती वखार
गुरुवार, सप्टेंबर ०१, २०२२
0
शिरपूर : मध्य प्रदेशातील सेंधवा तालुक्यांतर्गत चाचऱ्या गावात वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी टाकलेल्या छाप्यात सुमारे ५० लाख रुपये किमतीचे सागवान लाकूड, फर्निचर व यंत्रसामग्री जप्त केली. अवैधरीत्या वखार चालवून तेथे फर्निचर तयार केले जात असल्याचे आढळले. जप्त केलेले सागवान सुमारे तीन वर्षे जुने असून, महाराष्ट्राच्या सीमेतून तोडून नेल्याचा संशय आहे
चार आयशर ट्रक, ट्रॅक्टर व पिक-अप भरून लाकूड वाहताना वन विभागाच्या कर्मचाऱ्यांची पुरती दमछाक झाली. २७ ऑगस्टच्या सायंकाळपासून २८ ऑगस्टच्या पहाटेपर्यंत ही कारवाई सुरू होती. आरा कटाई मशिन, कटर, सागवानी लाकडाच्या तुळ्या, चौकट असा मुद्देमाल या कारवाईत जप्त करण्यात आला.
सेंधवा वनवृत्ताचे वनमंडळ अधिकारी अनुपम शर्मा यांना चाचऱ्या गावात संशयित दिनेश शिवनाथ (वय ४५) अवैधरीत्या वखार चालवत असल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी सहकाऱ्यांसह छापा टाकला. तेथील दृश्य पाहून अधिकारीही अवाक झाले.
संशयिताने सागवानापासून चौकट व अन्य फर्निचर तयार करून विक्रीचा उद्योग बिनबोभाट चालविला होता. लाकडाची पाहणी केल्यानंतर ते मध्य प्रदेश-महाराष्ट्राच्या हद्दीतील वृक्षतोड करून तस्करीद्वारे नेण्यात आल्याचा संशय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. सुमारे दोन ते तीन वर्षांपूर्वीचे लाकूड वखारीत असल्याचे दिसून आले. या मुद्देमालाची किंमत सुमारे ५० लाख रुपये आहे
सांगवी विभाग झोपेत
मध्य प्रदेशालगत शिरपूरची हद्द असून, तेथील वृक्षराजीच्या संरक्षणासाठी सांगवी वन विभागाला जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र वृक्षतोडीवर तेथील अधिकाऱ्यांचे कोणतेच नियंत्रण नसल्याची परिस्थिती आहे.
विशेष म्हणजे वृक्षतोड करून सागवानासारख्या मौल्यवान लाकडाच्या फळ्या तयार करून चक्क सायकलवरून वाहून नेल्या जातात, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे; परंतु आजवर सांगवी वनक्षेत्रातील कोणत्याच तस्कराला अटक करण्याची तसदी संबंधितांनी घेतलेली नाही.
तीन वर्षांपासून महाराष्ट्रातील लाकूड सेंधव्याच्या हद्दीतील दुर्गम गावापर्यंत पोचते आणि सांगवी कार्यालयाला त्याची कुणकुणही नसावी याविषयी आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
Tags

