पोलिसांना संशय आला म्हणून गाडी अडवली; चार तरुणांनी परराज्यातून आणलं होतं मोठं घबाड
गुरुवार, सप्टेंबर ०१, २०२२
0
औरंगाबाद: पोलिसांना संशय आल्याने चारचाकी वाहन थांबविण्याचा इशारा करताच आरोपींनी गाडी सोडून पळून गेले. मात्र पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला. आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर गाडीची डिक्की उघडून बघताच पोलिसही चक्रावले आहेत.
औरंगाबाद जिल्ह्यात हा प्रकार घडला आहे. पोलिसांना तब्बल ३४ किलो गांजा आढळून आला आहे. हा गांजा हैद्राबाद येथून शहरात विक्रीसाठी आणला जात होता. बेगमपुरा पोलिसांनी चारही तस्कराना अटक केली असून अमलीपदार्थ विक्रीचं मोठ रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सुरेश सागरे (रा.जाधववाडी,औरंगाबाद), सागर भालेरावं (रा. वाघलगाव, ता. फुलंब्री, जि. औरंगाबाद), संदेश ठाकूर (रा.मयूर पार्क,औरंगाबाद), शंकर काकडे (रा. आम्रपालीनगर, औरंगाबाद) अशी पोलिसांनी अटक केलेल्या तस्करांची नावे आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाजवळील आम्रपालीनगर भगात मुख्य रस्त्यावर बेगमपुरा पोलिसांचे पथक गस्तीवर असताना (एम.एच.२० सी.एस.६७७७) या क्रमांकाची इनोव्हा तेथे आली. संशय आल्याने पोलिसांनी चालकाला थांबण्याचा इशारा केला. मात्र कार पुढे जाऊन थांबली व त्यातील चारही तस्करांनी गाडी सोडून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांचा पाठलागा करीत चौघाना अटक केली.
पोलिसांनी गाडीची डिक्की उघडली असता त्यामध्ये दोन गोण्यात तब्बल ३४ किलो गांजा आढळून आला. हा गांजा हैद्राबाद राज्यातून आणल्याचे प्राथमिक तपासात समोर आले. गणेशोत्सव काळात हैद्राबाद येथून किरकोळ विक्रेत्यांना विकण्यासाठी हा गांजा पुरविण्यात येणार होता. बेगमपुरा पोलिसांनी या तस्करांना अटक केल्यानंतर आता जिल्हाभरात सक्रिय असलेलं अमली पदार्थ विक्रीच मोठ रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

