जळगाव : गुजरातच्या सुरत शहरात एक अनेक्षित घटना घडलीय. या घटनेमध्ये महाराष्ट्रच्या दोन नागरिकांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या जळगाव जिल्ह्यातील त्यांच्या गावावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. खरंतर त्यांचा अशाप्रकारे मृत्यू होईल, अशी कल्पनाही कुणी केली नव्हती. पण काळाचा घाला आला आणि दुर्देवी घटनेत दोघांचा मृत्यू झाला. दोन्ही जण जळगाव जिल्ह्याच्या अमळनेर तालुक्यातील शिरुड गावचे रहिवासी होते. त्यांच्या निधनामुळे गावात शोककळा पसरली आहे.
सुरत येथे लिफ्टची दुरूस्ती करतांना दोन जण सोळाव्या मजल्यावरून खाली पडून दगावले. सुरत येथील पांडेसरा भागात प्लॅटिनियम प्लाझा नामक सतरा मजली इमारतीचे काम सुरू आहे. शिरूड येथील रहिवासी निलेश प्रल्हाद पाटील आणि आकाश सुनिल बोरसे हे दोन्ही जण त्या ठिकाणी लिफ्ट बसविण्याचे काम करीत होते. ते आज देखील नित्यनेमानुसार कामाला गेलेले होते. 16 व्या मजल्यावर लिफ्ट दुरुस्त करण्याचे काम करत असतांना ते उभी असलेल्या शिडीचा अचानक तोल गेला. यात ते दोन्ही जण खाली पडले. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला.
हे दोन्ही जण नुकतंच गावी गणेशोत्सव साजरा करून सुरत येथे लिफ्ट दुरूस्तीच्या कामासाठी गेले होते. मात्र आज काळाने त्यांच्यावर घाला घातल्याने शिरूड गावावर शोककळा पसरली आहे.
