मिळालेल्या माहितीनुसार, राजनंदिनी कौस्तुभ सरनोबत असे मृत महिलेचे नाव आहे. रात्री उशिरा राजनंदिनी हिचा पती कौस्तुभ कृष्णराव सरनोबत याच्याविरोधात इस्लामपूर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. राजनंदिनी यांच्या माहेरचे नातेवाईक मिलिंद नानासाहेब सावंत यांनी इस्लामपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती कौस्तुभ कृष्णराव सरनोबत याला इस्लामपूर पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
राजनंदिनी हिला पहिल्या दोन्ही मुलीच झाल्याचा राग कौस्तुभच्या मनात होता. एक मुलगी दोन ते अडीच वर्षांची तर दुसरी मुलगी अवघी सहा महिन्यांची आहे. या रागातून कौस्तुभ याने रविवारी पहाटे सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास मॉर्निंग वॉकला जाण्याचा बहाणा करत पत्नीला आपल्या दुचाकीवरून कापूसखेड रस्त्याच्या दिशेने घेऊन गेला. कापूसखेड गावच्या हद्दीत रस्त्यापासून ३० ते ४० फूट अंतरावर असलेल्या एका शेतात नेले. तेथे पाण्याने काठोकाठ भरलेल्या विहिरीत राजनंदिनी हिला ढकलून दिले. तिला पोहता येत नसल्याने तिचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
काल पोलिसात माहिती देताना मात्र हा मृत्यू लघुशंकेसाठी विहीर परिसरात गेल्यानंतर पाय घसरून विहिरीत पडल्याने मृत्यू झाल्याचे कौस्तुभ याने पोलिसांना सांगितले होते. राजनंदिनी यांच्या नातेवाईकांनी मात्र हा घातपात असल्याची शंका व्यक्त करत पोलिसांनी याची चौकशी करावी, अशी मागणी कालपासूनच लावून धरली होती. त्यानंतर हत्येचा गुन्हा समोर आला आहे.
