संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत टोमॅटो विक्रीसाठी आलेल्या शेतकर्यास व्यापार्याने मारहाण केल्याने संतप्त झालेल्या शेतकर्यांनी सुमारे एक तास बाजार समितीचे गेटबंद आंदोलन केले. पोलिसांनी दोन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
संगमनेर तालुक्यातील रणखांब येथील शेतकरी किरण शिवाजी बारवे हा टोमॅटो घेऊन काल सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आला होता. बाजार समितीच्या आवारामध्ये किरण बारवे यांची पिकअप गाडी आणि व्यापारी आयुब पठाण यांची गाडी उभी होती. तुमची गाडी थोडी पुढे घ्या, असे किरण बारवे म्हटल्याचा आयुब पठाणला राग आला. यावेळी पठाण याने शेतकर्यास शिवीगाळ केली. जवळ असलेला त्याचा नातेवाईक अरबाल आयुब पठाण याने किरण याला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या टोमॅटो मार्केटमध्ये शेतकर्याला मारहाण झाल्याची माहिती मिळताच युवासेनेचे तालुका प्रमुख गुलाब भोसले, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार, शिवसेनेचे शहर प्रमुख प्रसाद पवार, महिला तालुकाप्रमुख शितल हासे, पप्पू कानकाटे, साहेबराव हासे, रणजीत ढेरंगे यांच्यासह शिवसैनिक आणि शेतकरी मोठ्या संख्येने कृषी उत्पन्नबाजार समितीच्या गेटजवळ जमा झाले. या मारहाणीच्या निषेधार्थ त्यांनी गेट बंद आंदोलन केले. शेतकर्याला मारहाण करणार्या दोघांवर गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत गेट बंद आंदोलन मागे घेणार नाही असा इशारा शिवसेना पदाधिकार्यांनी दिला.
आंदोलनाची माहिती समजताच पोलीस उपाधीक्षक राहुल मदने आणि प्रभारी पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले हे बाजार समितीमध्ये आले. शेतकर्याला मारहाण करणार्यांवर तात्काळ गुन्हा दाखल करू असे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी गेट बंद आंदोलन मागे घेतले. याबाबत किरण बारवे यांनी संगमनेर शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आयुब पठाण व अरबल पठाण या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
