राहुरी : वांबोरी येथे क्षुल्लक कारणामुळं एका कामगाराची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चप्पल दुरुस्तीच्या वीस रूपयाची मागणी करणाऱ्या चर्मकारावर एका ग्राहकाने खिळे ठोकण्याच्या लोखंडी बत्त्याने डोक्यावर हल्ला केला. या हल्ल्यामुळं चर्मकाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
विलास नामदेव कांबळे (६५) असं हत्या झालेल्या चर्मकाराचं नाव आहे. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. नगर तालुक्यातील मांजरसूंबा येथे राहणारा भाऊसाहेब किसन वाघमारे असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वांबोरी येथे खडांबे नाक्याजवळ २० सप्टेंबरला सायंकाळी सव्वाचार वाजता आरोपी वाघमारे चप्पल दुरुस्तीसाठी गटई कामगार कांबळे यांच्याकडे गेला. काम झाल्यावर कांबळे यांनी चप्पल दुरुस्तीचे वीस रुपये मागितले. त्यानंतर वाघमारेने रागाच्या भरात खिळे ठोकण्याचा लोखंडी बत्ता उचलून कांबळे यांच्या डोक्यावर मारला.
त्यानंतर कांबळे यांना उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, पुढील उपचारासाठी त्यांना नगर येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले होते. पंरतु, काल गुरुवारी रात्री अकरा वाजताच्या सुमारास कांबळे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
