प्रेमाचा भीषण शेवट! भरदिवसा डोक्यात गोळी झाडत 'ती'ला संपवलं अन् त्यानं मिलिटरीच्या गाडीखाली उडी मारली

फुले शाहू आंबेडकर
0
बोईसर परिसरात एका तरुणाने तरुणीवर भरदिवसा गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गोळीबाराची ही धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. प्रेम प्रकरणातून हा गोळीबार केल्याचं तपासात उघड झालं असून बोईसरमधील टीमा हॉस्पिटलजवळ हा गोळीबार झाला. या गोळीबारात स्नेहा दिनेशकुमार मेहतो या तरुणीचा डोक्याला गोळी लागल्याने मृत्यू झाला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर  आले असून भरदिवसा आरोपीनं तरुणीच्या डोक्यात पाठीमागून येत गोळी घातल्याचं यात दिसत आहे. 
गोळीबार करुन पळून जाण्याचा तयारीत असलेल्या कृष्णा यादव या आरोपीचा स्थानिकांनी पाठलाग केला. मात्र आरोपीने सीआयएसएफच्या गाडीखाली येऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सीआयएसएफच्या गाडीखाली आल्याने जखमी झालेल्या आरोपीवर रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला.

मुलीच्या कुटुंबियांकडून लग्न करण्याच्या आग्रहानंतरही तरुणाकडून लग्न करण्यास टाळाटाळ


बोईसर पोलिसांनी या संदर्भात गुन्हा दाखल केला असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. दरम्यान आरोपी आणि मयत मुलगी यांचं प्रेम प्रकरण होतं. मयत मुलीच्या कुटुंबियांकडून लग्न करण्याच्या आग्रहानंतरही तरुण लग्न करण्यास टाळाटाळ करत असल्याची माहिती मयत मुलीच्या आईकडून देण्यात आली आहे.

घटनेची माहिती मिळताच पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी इतर पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने घटनास्थळाचा पंचनामा केला. भरदिवसा झालेल्या गोळीबारामुळे परिसरात दहशतीचं वातावरण आहे. कृष्णा यादव असं या घटनेतील आरोपीचं नाव होतं. पोलिसांनी त्याच्याजवळ सापडलेली रिव्हॉल्वर जप्त केली आहे.

दरम्यान या थरारक घटनेनंतर बोईसर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दिवसाढवळ्या झालेल्या या घटनेनंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या तरुणाकडे रिव्हॉल्वर कुठून आलं? याबाबत देखील सवाल उपस्थित होऊ लागले आहेत. पालघर पोलिस आता या प्रकरणाचा तपास करत आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default