मिळालेल्या माहितीनुसार छत्तीसगडमधील महेंद्रगड जिल्ह्यातील छिपछीपी या गावात शुक्रवारी (२१ ऑक्टोबर) ही घटना घडली आहे. येथील आरोग्य केंद्रात पीडित नर्स एकटीच काम करत होती. हीच संधी साधून आरोपींनी संध्याकाळी साधारण ३ वाजेच्या सुमारास आरोग्य केंद्रात प्रवेश केला. त्यानंतर आरोपींनी पीडित नर्सला बांधून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. विशेष म्हणजे आरोपींनी या अत्याचाराचे चित्रण केले असून याबाबत कोणाला सांगितले तर जीवे मारण्याची धमकी त्यांनी पीडित नर्सला दिली आहे. तसा दावा पीडित नर्सने केला आहे.
या घटनेनंतर पीडित नर्सने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. तक्रार दाखल होताच पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले आहे. दरम्यान या घटनेनंतर छत्तीसगडमध्ये राजकीय वातावरण तापले आहे. भारतीय जनता पार्टीकडून भुपेश बघेल यांच्या सरकारविरोधात मोर्चा काढण्यात आला. तर महेंद्रगडमधील काँग्रेसचे आमदार विनय जैस्वाल यांनी भाजपा या घटनेचे राजकारण करत असून आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान, या घटनेनंतर दुर्गम भागात काम करणाऱ्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी निषेध व्यक्त केला आहे. तसेच छत्तीसगड सरकारने आम्हाला सुरक्षा पुरवावी, अशी मागणी या कर्मचाऱ्यांनी केली आहे. तसेच या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करण्यात आली नाही तर आम्ही काम बंद करू, असा इशाराही आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी दिला आहे.
