नाशिकरोड
नाशिक-पुणे महामार्गावर असलेल्या विजय ममता सिनेमा गृह समोरील शिवाजीनगर परिसरात दांडिया खेळण्याच्या कारणावरून एका युवकाचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला आहे...
या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता. दरम्यान या खून प्रकरणी उपनगर पोलिसांनी चार जणांना अटक केली असून त्यातील तीन जण अल्पवयीन आहे.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. दसऱ्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली असून चिंतेचे वातावरण पसरले आहे.
खून करण्यात आलेल्या युवकाचे नाव बाबू लोट असे असून विजय ममता सिनेमागृह समोर असलेल्या शिवाजीनगर परिसरात एका मंडळांनी आयोजित केलेल्या दांडिया रास कार्यक्रमात हा प्रकार घडला.
बाबू लोट व इतर चार ते पाच कार्यकर्त्यांमध्ये किरकोळ कारणावरून बाचाबाची झाली त्याचे रूपांतर शिवीगाळ व हाणामारी झाले व त्यानंतर संतप्त झालेल्या मारेकऱ्यांनी धारदार शस्त्राच्या साहाय्याने बाबू लोट याच्यावर गंभीर हल्ला करून त्याला जखमी केले.
दरम्यान या घटनेनंतर दांडिया खेळणाऱ्यांमध्ये घबराट निर्माण झाली व कार्यकर्ते इकडून तिकडे पळू लागले तर जखमी झालेल्या लोट याला उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान आज सकाळी त्याचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर उपनगर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश माईनकर यांचे मार्गदर्शनाखाली सुरू आहे. ही घटना समजताच पोलीस उपायुक्त विजय खरात सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सिद्धेश्वर धुमाळ यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली.
