दुकानातच तरुणाची आत्‍महत्‍या; महिलांच्‍या ठिय्यानंतर दारूचे दुकान केले सील

फुले शाहू आंबेडकर
0
मेहुणबारे  : पिलखोड (ता.चाळीसगाव) येथे देशी दारूच्या दुकानात काम करणाऱ्या 22 वर्षीय तरुणाने दुकानातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आज (३ सप्‍टेंबर) सकाळी उघडकीस आले. घटनेची माहिती गावात कळताच घटनास्थळी ग्रामस्थांसह महिला पोहचल्या व महिलांनी एकच आक्रोश करत रस्त्यावर ठाण मांडले 
पिलखोड  चाळीसगाव येथील कुणाल सोपान जाधव (वय 22) याने आज सकाळी साडेसातच्या पूर्वी पिलखोड गावाच्या पुढे बांधकाम विभागाच्या ऑफीसच्या बाजुला असलेल्या देशी दारूच्या दुकानात अँगलला दोरीच्या सहाय्याने गळफास  घेऊन आत्महत्या केली. ही माहिती मिळताच मृत जाधव याच्‍या नातेवाईकांसह गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत जाधव याचा मृतदेह खाली उतरविला. यानंतर मृतदेह मेहुणबारे (ता.चाळीसगाव) येथील ग्रामीण रूग्णालयात विच्छेदन करण्यासाठी नेला. याप्रकरणी गोरख गंगाधर बाविस्कर यांनी दिलेल्या माहीतीवरुन मेहूणबारे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान दुकानातच गळफास घेतेलेल्या कुणाल जाधव याच्या आत्महत्येचे कारण समजून आले नाही. त्याच्या पश्चात आई, वडिल व भाऊ असा परिवार आहे.

संतप्त महिला रस्त्यावर अन्‌ दुकान सील

कुणाल जाधव याने देशी दारूच्या दुकानातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला. यानंतर संतप्त ग्रामस्थांनी चाळीसगाव- मालेगाव महामार्गावर येत ठिय्या दिला. सकाळी साडे आठवाजेपासून बारा वाजेपर्यंत सुमारे चार तास महिलांसह ग्रामस्थ रस्त्यावर बसून या घटनेप्रकरणी संताप व्यक्त करत होते. घटनास्थळी मेहुणबारे पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विष्णू आव्हाड व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. ग्रामस्थांनी मृत कुणाल जाधव याचा मृतदेह देशी दारू दुकानाच्या ओट्यावर नेत जोपर्यंत हे दारुचे दुकान सील करत नाही; तोपर्यंत मृतदेह येथून हलवणार नाही असा पवित्रा घेतला. चाळीसगावचे तहसीलदार अमोल मोरे व साहाय्यक पोलीस निरीक्षक विष्णू आव्हाड यांनी देशी दारु दुकान सील केले









टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default